बंगल्यात फुलांऐवजी फुलवली गांजाची बाग... पुण्यात हायप्रोफाईल 'ड्रग फार्मिंग'चा पर्दाफाश...

Share:
Main Image
Last updated: 28-Apr-2026

पुणे, (प्रतिनिधी) २८ एप्रिल - आतापर्यंत शेतात वांगी, तूर किंवा मिरचीच्या पिकात लपवून गांजाची लागवड केल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, पुण्याच्या लोहगाव परिसरात एका बहाद्दराने चक्क भाड्याने घेतलेल्या बंगल्याच्या आवारातच गांजाची शेती पिकवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी या 'बंगला गार्डन'वर छापा टाकून तब्बल ४१ गांजाची झाडे आणि इतर मुद्देमाल मिळून ६ लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे.

लोहगावमधील 'नमो पॅराडाईज'मध्ये कारवाई

लोहगाव परिसरातील पठारे वस्ती येथील 'नमो पॅराडाईज' या बंगल्यात अमली पदार्थांची शेती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हर्ष भरतकुमार पांचाल (वय ३०) याच्या घरावर छापा टाकला. यावेळी बंगल्याच्या परिसरात पद्धतशीरपणे जोपासलेली गांजाची ४१ झाडे पाहून पोलीसही अवाक झाले.

Advertisement

विक्रीचा मोठा प्लॅन

केवळ झाडे लावून हा तरुण थांबला नव्हता, तर त्याने या गांजाची पद्धतशीरपणे विक्री करण्याचा धंदाही सुरू केला होता. पोलिसांनी बंगल्यासह तेथील वाहनाचीही झडती घेतली असता, त्यातूनही गांजा हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संशयित हर्ष याने हा बंगला भाड्याने घेतला होता. त्यामुळे आता बेकायदेशीर कृत्यासाठी बंगला दिल्याने मूळ मालकावरही कारवाईची टांगती तलवार आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाची कामगिरी

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा धामणे-पाटील यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. शहराच्या मध्यवस्तीत अशा प्रकारे अमली पदार्थांची लागवड होत असल्याने नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.

Advertisement

Comments

No comments yet.