पेट्रोल पंप चालकाकडून लाच घेणाऱ्या निरीक्षकाचा 'गेम'... एसीबीची दिंडोरीत मोठी कारवाई...

Share:
Main Image
Last updated: 28-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २८ एप्रिल - पेट्रोल पंपाचे वार्षिक निरीक्षण करून पडताळणी प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात २४ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वणी विभागाच्या वैध मापनशास्त्र निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. भगवान प्रल्हाद डोल्हारे असे या लाचखोर लोकसेवकाचे नाव असून, त्याच्यावर दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  

नक्की काय आहे प्रकरण?

यातील तक्रारदार यांचा अवनखेड शिवारात 'ओमसाई' नावाचा पेट्रोल पंप आहे. या पंपाचे वार्षिक निरीक्षण करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन शासकीय शुल्क भरून पडताळणीचा अर्ज केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने पेट्रोल पंपाची पाहणी करण्यासाठी आलेल्या वैध मापनशास्त्र विभागाचे निरीक्षक भगवान डोल्हारे यांनी निरीक्षणाचे काम केले. मात्र, पडताळणी प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात त्यांनी शासकीय शुल्काव्यतिरिक्त तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली.  

प्रति नोझल ६ हजारांचा दर!

Advertisement

निरीक्षक डोल्हारे यांनी तक्रारदाराकडे पेट्रोल पंपाच्या प्रति नोझल ६,००० रुपये याप्रमाणे चार नोझलचे एकूण २४,००० रुपये लाचेची मागणी केली. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली होती. मंगळवारी (दि. २८ एप्रिल) या तक्रारीची पडताळणी करून सापळा रचण्यात आला. यावेळी २४ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना डोल्हारे यांना रंगेहात पकडण्यात आले.  

एसीबीचे यशस्वी सापळा नियोजन

ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांनी केले, तर त्यांना पोलीस हवालदार विनोद चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे यांनी सहकार्य केले.  

नागरिकांना आवाहन

भ्रष्टाचारासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास किंवा कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Comments

No comments yet.