थरार! निमाणीत वृद्ध महिलेवर चाकू हल्ला करून लुटले... दोन महिला चोरट्यांना प्रवाशांनी चोप देत पकडले....

Share:
Main Image
Last updated: 28-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २८ एप्रिल - शहरातील वर्दळीच्या निमाणी बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या दोन महिलांना प्रवाशांच्या मदतीने पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या महिलांनी एका वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून जखमी करत लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा सुमारे २ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

पळसे (ता. जि. नाशिक) येथील रहिवासी रेखा समाधान चारोस्कर या सोमवारी (दि. २७) आपल्या वृद्ध आई-वडिलांना बाहेरगावी सोडण्यासाठी निमाणी बसस्थानकात आल्या होत्या. त्यांनी आपल्या आईला परिसरातील एका झाडाखाली बसवले आणि त्या बसची चौकशी करण्यासाठी गेल्या. हीच संधी साधून संशयित महिलांनी एकांतात बसलेल्या वृद्ध आजींना गाठले. त्यांना चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याचे गंठण ओरबाडण्याचा प्रयत्न केला.

वृद्ध महिलेवर चाकूने वार

Advertisement

चोरीला प्रतिकार केला असता, संशयित महिलांनी आजींच्या पाठीवर आणि हातावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. त्याच वेळी रेखा चारोस्कर तेथे पोहोचल्या. त्यांनी आरडाओरड करत धाडसाने प्रतिकार केल्यामुळे बसस्थानकातील अन्य प्रवासी मदतीला धावून आले. प्रवाशांच्या मदतीने या दोन्ही भामट्या महिलांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

अटकेतील संशयित आणि जप्त मुद्देमाल

पंचवटी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून निर्मला अशोक कसबे उर्फ निर्मला विजय लोंढे (वय ४०) व ताराबाई मदन खराळे (वय ५२, दोघी रा. संसरीगाव, देवळाली कॅम्प) या संशयित महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे सोन्याचे गंठण आणि बसमध्ये चढणाऱ्या अन्य प्रवाशांचे चोरलेले दोन मोबाईल असा एकूण २ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

या दोन्ही महिला सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता असून, त्यांच्याकडून शहर परिसरातील चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ करत आहेत.

Comments

No comments yet.