"मासिक पाळीबद्दल मुलाशी संवाद साधला आणि... अभिनेत्री गिरिजा ओकने सांगितला तो किस्सा...

Share:
Main Image
Last updated: 27-Apr-2026

पुणे, (प्रतिनिधी) २७ एप्रिल - आपल्या सहजसुंदर अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री गिरिजा ओक सध्या तिच्या एका कौटुंबिक किस्स्यामुळे चर्चेत आली आहे. 'नॅशनल क्रश' म्हणून सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या गिरिजाने आपल्या १२ वर्षांच्या मुलाला, कबीरला दिलेले संस्कार आणि त्याने दाखवलेली संवेदनशीलता पाहून सर्वच स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. मुलाला 'मासिक पाळी'सारख्या विषयावर योग्य वयात माहिती दिल्याने एका मुलीला शाळेत झालेली मदत आणि त्यानंतर पालकांमध्ये झालेली चर्चा, असा सकारात्मक अनुभव गिरिजाने एका मुलाखतीत शेअर केला.

नेमका किस्सा काय?

गिरिजाने एका पॉडकास्ट मुलाखतीत सांगितले की, तिचा मुलगा कबीर आता १२ वर्षांचा झाला आहे. गिरिजा आणि तिचा पती सुहृद गोडबोले यांनी मुलाला सुरुवातीपासूनच नैसर्गिक शारीरिक बदलांविषयी, विशेषतः मासिक पाळीबद्दल मोकळेपणाने माहिती दिली होती.

या शिक्षणाचा सकारात्मक परिणाम एका घटनेतून दिसून आला. एका दिवशी कबीरच्या शाळेतील एका मुलीला मासिक पाळी आली. कबीरला या गोष्टीची जाण होती. शाळा सुटल्यानंतर मेट्रोने घरी परतताना, कबीरने पळत जाऊन एक जागा पकडली आणि त्या मुलीला तिथे बसण्यास सांगितले, जेणेकरून तिला त्रास होणार नाही.

मुलीच्या आईचा फोन आणि कौतुक

Advertisement

त्या मुलीने घरी गेल्यावर आपल्या आईला कबीरने केलेल्या मदतीबद्दल सांगितले. यानंतर त्या मुलीच्या आईने स्वतः गिरिजाचे पती सुहृद यांना फोन केला. "तुम्ही कबीरला मासिक पाळीबद्दल जी माहिती दिली आहे आणि जे संस्कार दिले आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद आहेत," अशा शब्दांत त्यांनी कबीरचे आणि त्याच्या पालकांचे आभार मानले.

प्राणी आणि मानवी शरीरशास्त्राची माहिती

गिरिजा म्हणाली, "आमच्या घरी दोन श्वान (Pet Dogs) आहेत. त्यामुळे प्राणी आणि मानवी स्त्रिया यांच्यातील 'मेन्स्ट्रुअल सायकल' (Menstrual Cycle) मध्ये काय फरक असतो, हे आम्ही त्याला समजावून सांगितले होते. जेव्हा मला या घटनेबद्दल कळलं, तेव्हा आपण मुलाला योग्य संस्कार दिले आहेत, याची जाणीव होऊन खूप समाधान वाटलं."

प्रगल्भ विचारांची 'सून' आणि 'आई'

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखक श्रीरंग गोडबोले यांची सून असलेल्या गिरिजा ओकने नेहमीच आपल्या कामातून आणि विचारातून प्रगल्भता दाखवली आहे. शाहरुख खान आणि आमिर खान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केल्यानंतरही, गिरिजाचे पाय जमिनीवर आहेत, हे तिच्या या मुलावरील संस्कारांतून अधोरेखित होत आहे.

आजच्या काळात मुलांशी अशा विषयांवर मोकळेपणाने संवाद साधणे किती गरजेचे आहे, याचाच एक वस्तुपाठ गिरिजा आणि सुहृद गोडबोले यांनी घालून दिला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.