नाशिक, (प्रतिनिधी) २७ एप्रिल - दैवी चमत्काराच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचा विळखा किती खोलवर होता, याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. खरातने केवळ महिलांचीच नव्हे, तर एका चार्टर्ड अकाउंटंटची (CA) देखील ८ कोटी ७६ लाख ५ हजार ५६० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, खरातवर संशय आल्याने या सीएने त्याच्या फार्महाऊसवर स्वतःचा माणूस 'कूक' म्हणून पाठवून या भोंदूचे काळे कारनामे उघडकीस आणले आहेत.
मृत्यूचा धाक आणि 'अवतार पूजा'
खरातने संबंधित सीएला त्यांच्या आई-वडिलांच्या मृत्यूची आणि व्यवसायात मोठ्या संकटाची भीती घातली होती. हे 'गंडांतर' टाळण्यासाठी 'अवतार पूजा' आणि 'सिद्ध पूजा' करणे आवश्यक असल्याचे त्याने भासवले. वावी येथील दर्गा आणि त्रिवेंद्रमच्या समुद्रकिनाऱ्यावर या पूजा करण्यात आल्या. आई-वडिलांच्या दीर्घायुष्यासाठी खरातने टप्प्याटप्प्याने या सीएकडून कोट्यवधी रुपये उकळले.
नकली नाग आणि हातचलाखीचे प्रयोग
खरात हा लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी हातचलाखीचा वापर करायचा. सीएने दिलेल्या माहितीनुसार, खरातने हवेतून 'काजू कतली' काढून त्यांना प्रभावित केले होते. तसेच, रात्रीच्या वेळी पूजा करताना अंधारात नकली नाग किंवा हालचाली दाखवून नागदेवतेने दर्शन दिल्याचे तो भासवायचा. याच भीतीपोटी सीएने आपल्या भावाच्या खात्यातून आणि स्वतःच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खरातला दिले.
कूकने काढले अनैतिक कृत्यांचे वाभाडे
सीएला खरातच्या वागण्याचा संशय आल्याने त्यांनी एका व्यक्तीला खरातच्या फार्महाऊसवर स्वयंपाकी (कूक) म्हणून कामाला लावले. या 'हेर' कूकने खरातचे सर्व गुपित उघड केले.
खरात मुली आणि महिलांना फार्महाऊसवर आणण्यापूर्वी सीसीटीव्ही बंद करायला सांगायचा.
दारूच्या नशेत अश्लील कृत्ये करणे आणि नशेत असताना बेडवरच लघवी करण्यापर्यंत खरातची मजल गेली होती.
तो स्पाय कॅमेरा आणि हातचलाखीने लोकांना कसे फसवतो, हे सर्व पुरावे या कूकने गोळा केले.
खंडणी आणि फसवणुकीचा आकडा मोठा
खरातने केवळ या सीएलाच नव्हे, तर त्यांच्या ऑफिस बॉयच्या पत्नीसोबतही अश्लील कृत्य केल्याचे समोर आले आहे. "माझ्या मित्राचा मृत्यू कॅन्सरने होईल, असे भाकीत खरातने वर्तवले होते आणि योगायोगाने तसेच घडल्याने माझा त्याच्यावर अंधविश्वास बसला होता. मात्र, नंतर तो मृत्यू नैसर्गिक असल्याचे समजले," असेही या सीएने आपल्या जबानीत म्हटले आहे. मार्च महिन्यातील कामाच्या व्यापामुळे तक्रार देण्यास उशीर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या एसआयटी (SIT) या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, खरातच्या संपत्तीची आणि त्याने आणखी किती लोकांना अशा प्रकारे लुटले आहे, याची माहिती घेतली जात आहे. या घटनेमुळे नाशिकसह महाराष्ट्रभरात खळबळ उडाली आहे.