नाशिक, (प्रतिनिधी) २७ फेब्रुवारी - शहरातील फाळके रोड परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून एका तरुणावर टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. संशयितांनी फायटर आणि बेसबॉल स्टिकचा वापर करून तरुणाला बेदम मारहाण केली असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील एका संशयिताला तात्काळ अटक केली असून अन्य सात जण पसार झाले आहेत.
रिजवान सुलतान शेख (३७, रा. जितननगर, वडाळा रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तर मारूख मनोद्दीन कोकणी, अब्दुलहादी कोकणी, अल्माष उर्फ फरीन कोकणी, सिदरा नाचान, मैनुद्दीन कोकणी, सलाहद्दीन कोकणी व त्यांचा वाहन चालक (नाव माहीत नाही) हे सात जण पसार झाले आहेत. याप्रकरणी फरान फरिद उद्दीन कोकणी (रा. फकीर मेन्शन, फाळके रोड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फरान कोकणी यांचा हार्डवेअरचा व्यवसाय आहे. शनिवारी (दि. २५) सायंकाळी ते आपल्या दुकानात असताना संशयित टोळक्याने प्रॉपर्टीच्या जुन्या वादातून त्यांचा चुलत भाऊ मोईन नवाज गुलाम मुहम्मद कोकणी याला गाठले. यावेळी टोळक्याने मोईन याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. संशयितांनी आपल्याकडील फायटर आणि बेसबॉल स्टिकने मोईन याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात मोईन गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एका संशयिताला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुषार आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.
नाशिक : बसमध्ये चढतांना महिलेच्या पर्समधील दागिने चोरट्यांनी हातोहात लांबविल्याची घटना निमाणी बसस्थानकात घडली. या घटनेत सुमारे १ लाख ६० हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वाती अजय निचळ (२५ रा. देवयाणी अपा.बनकर चौक,द्वारका) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. निचळ या रविवारी (दि.२६) बाहेरगावी जाण्यासाठी निमाणी बसस्थानकात गेल्या होत्या. मालेगाव बसमध्ये त्या चढत असतांना ही घटना घडली. गर्दीची संधी साधात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्स मधील आडावतकर सराफ नावाची मिनी पर्स चोरून नेली. या पर्स मध्ये २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत,१२ ग्रॅम वजनाची सोनसाखळी व ७ ग्रॅम वजनाचे ब्रॅसलेट असे सुमारे १ लाख ६० हजार रूपये किमतीचे अलंकार होते. हवालदार रोकडे करीत आहेत.