नाशिक, (प्रतिनिधी) २७ एप्रिल - शहरातील मुंबईनाका परिसरातील सायबा हॉटेल भागात कार काढण्याच्या किरकोळ वादातून दोन दुचाकीस्वारांनी एका वकिलाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत वकिल जखमी झाले असून, झटापटीत त्यांची १६ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळीही गहाळ झाली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ जठार आणि अनिकेत झिटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत विनायक सदाशिव सहाणे (वय ५३, रा. सराफ बाजार) यांनी फिर्याद दिली आहे. सहाणे हे पेशाने वकील असून शनिवारी (दि. २५) रात्रीच्या सुमारास ते काही कामानिमित्त मुंबईनाका भागातील सायबा हॉटेल परिसरात गेले होते. त्यांनी आपली कार हॉटेल परिसरात पार्क केली होती.
काम आटोपल्यानंतर सहाणे आपली कार काढण्यासाठी आले असता, संशयितांनी त्यांच्या कारच्या पाठीमागे आपली दुचाकी उभी केली होती. सहाणे यांनी संशयितांना दुचाकी बाजूला घेण्याची विनंती केली. मात्र, याचा राग आल्याने संशयितांनी सहाणे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले आणि दोघा संशयितांनी सहाणे यांना बेदम मारहाण केली. या घटनेत सहाणे यांच्या डोक्याला व तोंडाला दुखापत झाली आहे.
सोनसाखळी चोरी की गहाळ?
मारहाणीच्या या घटनेदरम्यान झालेल्या झटापटीत फिर्यादी सहाणे यांच्या गळ्यातील सुमारे १६ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी गहाळ झाली आहे. मारहाण केल्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
कारची काच फोडून चोरी
नाशिक : पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप असलेली बॅग चोरून नेली. ही घटना तपोवनातील स्वामी नारायण मंदिर भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशांत प्रकाश आडसुले (मुळ रा. दिवा ईस्ट ठाणे हल्ली संसरी गाव देवळाली कॅम्प) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आडसुले कुटूंबिय रविवारी (दि.२६ ) देवदर्शनासाठी शहरात आले होते. तपोवनातील स्वामी नारायण मंदिरात ते देवदर्शन घेत असतांना ही घटना घडली. मंदिर परिसरात पार्क केलेल्या एमएच ०१ वायए २२२९ या इनोव्हा कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप बॅग चोरून नेली. बॅकेत लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप डोंगल, वेगवेगळ््या बँकाचे एटीएम कार्ड व हेडफोन असा सुमारे २४ हजार ४०० रूपये किमतीचा ऐवज होता. उपनिरीक्षक पंचमुखे करीत आहेत.