वॉशिंग्टन, २६ एप्रिल - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासाबाहेर म्हणजेच 'व्हाईट हाऊस' परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर ट्रम्प यांनी आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली असून, यामध्ये त्यांनी सुरक्षिततेच्या मुद्द्यासोबतच एका मोठ्या जागतिक संघर्षाचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणाचा धागा त्यांनी इराणसोबत जोडल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
व्हाईट हाऊसच्या परिसरात सुरक्षा रक्षकांनी एका संशयित व्यक्तीवर गोळीबार केला. ही घटना घडली तेव्हा ट्रम्प पत्रकार परिषदेत बोलत होते. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तातडीने स्टेजवरून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. काही वेळानंतर पुन्हा येत ट्रम्प यांनी परिस्थिती निवळल्याचे सांगितले आणि सीक्रेट सर्व्हिसच्या तत्परतेचे कौतुक केले.
ट्रम्प यांचा इराणवर निशाणा
या घटनेवर भाष्य करताना ट्रम्प यांनी इराणचा उल्लेख करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ट्रम्प म्हणाले की, "इराणकडून आपल्याला धमक्या मिळत आहेत, हे काही नवीन नाही. माझ्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास, त्याचा परिणाम केवळ एका हल्ल्यापुरता मर्यादित राहणार नाही. जर इराणने अशा प्रकारचे धाडस केले, तर अमेरिका इराणला पूर्णपणे नष्ट करण्यास मागे-पुढे पाहणार नाही."
युद्धाच्या ठिणगीची शक्यता?
ट्रम्प यांनी या घटनेला इराणशी जोडल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आता टोकाला पोहोचण्याची शक्यता आहे. इराणकडून त्यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याचा दावा ट्रम्प यांनी वारंवार केला आहे. "जर माझ्यावर हल्ला झाला, तर ते अमेरिकेवरचे आक्रमण मानले जाईल आणि त्याचे उत्तर युद्धानेच दिले जाईल," असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सुरक्षा यंत्रणा सतर्क
व्हाईट हाऊसबाहेर झालेल्या या गोळीबारानंतर अमेरिकन सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. संबंधित हल्लेखोराचा उद्देश काय होता आणि त्याचे कोणाशी संबंध आहेत, याचा तपास सध्या सुरू आहे. मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत ट्रम्प यांनी या घटनेला 'इराण वार'शी जोडल्याने जागतिक राजनैतिक वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.