‘मातोश्री’वरील बैठकीला या खासदाराची पुन्हा दांडी... ठाकरे गटाची धाकधूक वाढली...

Share:
Main Image
Last updated: 25-Apr-2026

परभणी, (प्रतिनिधी) २५ एप्रिल - राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आता परभणी जिल्ह्यातून ठाकरे गटासाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. निष्ठावंत मानले जाणारे परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव हे शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर बोलावलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला खासदार जाधव यांनी सलग दुसऱ्यांदा दांडी मारल्याने त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चांना आता उधाण आले आहे.

महत्त्वाच्या बैठकीत खासदारच गैरहजर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि पक्षसंघटना बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि परभणीचे आमदार राहुल पाटील उपस्थित होते. मात्र, ज्यांच्या मतदारसंघाची ही बैठक होती, ते खासदार संजय जाधवच गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अस्वस्थतेचे नेमके कारण काय?

Advertisement

चार दिवसांपूर्वी परभणी येथील शासकीय विश्रामगृहात (गेस्ट हाऊस) शिवसैनिकांची एक बैठक पार पडली होती. या बैठकीत बोलताना खासदार जाधव यांनी आपली मनातील अस्वस्थता उघडपणे बोलून दाखवली होती. गेल्या काही दिवसांपासून पक्षअंतर्गत घडामोडी आणि काही स्थानिक विषयांवरून ते नाराज असल्याची चिन्हे दिसत होती. त्यांच्या या जाहीर अस्वस्थतेनंतर आता ‘मातोश्री’वरील बैठकीला अनुपस्थित राहणे, हा केवळ योगायोग नसून मोठ्या राजकीय निर्णयाची नांदी असल्याचे मानले जात आहे.

ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार?

परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि संजय जाधव हे या बालेकिल्ल्याचे खंबीर नेतृत्व आहेत. त्यांनी पक्ष सोडल्यास मराठवाड्यात ठाकरे गटाला मोठा फटका बसू शकतो. जाधव सत्ताधारी गटात सामील होतात की वेगळी भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

?s=20

Comments

No comments yet.