त्र्यंबकेश्वर 'व्हीआयपी' दर्शन रॅकेटचा पर्दाफाश... दररोज २५ हजारांचे 'कलेक्शन'... १५ मिनिटांत दर्शनासाठी १२ हजारांची लूट...

Share:
Main Image
Last updated: 25-Apr-2026

त्र्यंबकेश्वर, (प्रतिनिधी) २५ एप्रिल - जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भाविकांची लूट करणाऱ्या 'व्हीआयपी दर्शन' रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य दुवा आणि मध्यस्थांच्या टोळीचा म्होरक्या वसंत उर्फ नारायण कचरू मुर्तडक (२६) याला त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासात या टोळीकडून दररोज २५ हजार रुपयांहून अधिकचे कलेक्शन संशयित कडलग यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

नेमके प्रकरण काय?

पंचवटीतील भाविक आनंदा सुरेश मेहेंदळे (४६) यांनी याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार संशयित गोटीराम पेहरे, अभिषेक कडलग, ओम कडलग आणि पुरुषोत्तम कडलग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी या संशयितांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. व्ही. लाड यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.

असे चालायचे रॅकेट

दर्शन रांगेत तासनतास ताटकळत उभे असलेल्या भाविकांना हे मध्यस्थ गाठायचे. अवघ्या १५ मिनिटांत 'व्हीआयपी दर्शन' करून देण्याचे आमिष दाखवून प्रत्येक भाविकाकडून ३ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळली जात असे. पैसे निश्चित झाल्यानंतर मध्यस्थ भाविकांना घेऊन संशयित कडलग यांच्याकडे सोपवत आणि तेथून त्यांना थेट मंदिरात प्रवेश दिला जात असे.

६०० पेक्षा जास्त वेळा पैशांचे व्यवहार

Advertisement

पोलिस तपासात मुर्तडक हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडे सात साथीदारांची फळी असून, ते देशभरातून येणाऱ्या भाविकांना जाळ्यात ओढत होते. धक्कादायक बाब म्हणजे:

मुर्तडक दररोज २५ ते २८ हजार रुपये संशयित कडलग याला पोहोचवत होता.

मुर्तडकच्या बँक खात्यातून कडलग व अन्य संशयितांच्या खात्यावर ६०० पेक्षा जास्त वेळा ऑनलाइन व्यवहार झाल्याचे पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहेत.

"या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, भाविकांची लूट थांबवण्यासाठी या रॅकेटमधील सर्व साखळीचा शोध घेतला जात आहे."

— त्र्यंबकेश्वर पोलिस

न्यायालयीन कामकाज

सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे अभियोग कक्षाच्या सहाय्यक संचालक किरण बेंडभर व सहाय्यक अभियोक्ता सायली गोखले यांनी युक्तिवाद केला. तर कडलगच्या वतीने वकील राहुल कासलीवाल यांनी बाजू मांडली. पोलिसांनी मांडलेले तपासातील मुद्दे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे मंदिर परिसरात अवैध दर्शन घडवून आणणाऱ्या मध्यस्थांचे धाबे दणाणले आहेत.

Comments

No comments yet.