भररस्त्यात महिलेची प्रसूती... साड्या, स्कार्फचा महिलांनी धरला आडोसा...

Share:
Main Image
Last updated: 25-Apr-2026

पुणे, (प्रतिनिधी) २५ एप्रिल - "माणुसकी संपली आहे" असे म्हणणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी एक घटना शिरूर शहरात घडली. प्रसूती कळांनी विव्हळणाऱ्या एका गरीब मातेसाठी संपूर्ण 'निर्माण प्लाझा' परिसर धावून आला. अनोळखी महिलांनी साड्यांचा आडोसा केला, तर महिला डॉक्टरांच्या प्रसंगावधनामुळे रडत नसलेल्या बाळाचे प्राण वाचले. या थरारक पण भावूक प्रसंगानंतर 'निर्माण प्लाझावर माणुसकीचा जन्म झाला' अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

प्रसंग नेमका काय?

जोशीवाडी येथील एक गरीब गरोदर महिला शनिवारी सकाळी पोटात तीव्र कळा येत असल्याने शिरूर ग्रामीण रुग्णालयाकडे पायी निघाली होती. मात्र, निर्माण प्लाझा परिसरात येताच तिला असह्य कळा सुरू झाल्या आणि ती रस्त्यातच बसली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच परिसरातील महिलांनी क्षणाचाही विलंब न करता तिथे धाव घेतली.

साड्यांचा आडोसा अन् सुरक्षित प्रसूती

रस्त्यावर वर्दळ असतानाही मातेची अब्रू राखण्यासाठी उपस्थित महिलांनी तत्परता दाखवली. कुणी स्वतःचा स्कार्फ काढला, तर कुणी जवळच्या घरातून साड्या आणल्या. काही मिनिटांतच साड्यांचा आडोसा करून एक तात्पुरते 'प्रसूती गृह' तयार करण्यात आले. या महिलांच्या मदतीने त्या मातेने एका बाळाला जन्म दिला.

Advertisement

डॉक्टरांचे प्रसंगावधान: बाळाला मिळाले जीवदान

बाळाचा जन्म तर झाला, पण बाळ रडत नसल्याने परिसरात शांतता पसरली आणि उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच वेळी नगरसेविका डॉ. सुनिता पोटे आणि पूजा पोटावळे तिथे दाखल झाल्या. डॉ. पोटे यांनी कसलाही विचार न करता रस्त्यावरच बाळाला तपासले आणि आवश्यक उपचार केले. काही क्षणांतच बाळ रडू लागले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या नव्या जन्माचे स्वागत केले.

सर्वांच्या मदतीचा ओघ

या संकटाच्या काळात केवळ महिलाच नव्हे, तर रिक्षाचालक, मेडिकल स्टोअर चालक, स्थानिक पत्रकार आणि नागरिक मदतीसाठी सरसावले. त्यानंतर आई आणि बाळाला तातडीने 'मिरा नर्सिंग होम'मध्ये हलवण्यात आले. सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

"प्रसंग कठीण होता, पण शिरूरकरांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. रस्त्यावर धावून आलेल्या त्या महिला आणि नागरिकांमुळेच आज एका मातेचे मातृत्व सुरक्षित राहिले."

— डॉ. सुनिता पोटे, नगरसेविका

Comments

No comments yet.