नाशिक, (प्रतिनिधी) २५ एप्रिल - मित्रांसोबत गप्पा मारत असताना झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले असून, एका तरुणाने आपल्याच मित्रावर दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड परिसरातील अनुराधा टॉकीज भागात घडली आहे. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी संशयित हल्लेखोराला तात्काळ अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित राज प्रविण खैरणार (२२, रा. मातोश्री बंगला, सुवर्ण सोसायटी, आर्टिलरी सेंटर रोड) आणि जखमी यश विजय गायकवाड (२३) हे एकमेकांचे मित्र आहेत. शुक्रवारी (दि. २४) पहाटेच्या सुमारास ते अनुराधा टॉकीजसमोरील कपालेश्वर हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या एका इमारतीच्या मोकळ्या आवारात बसलेले होते.
यावेळी त्यांच्यात कुठल्यातरी किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. वादाचे पर्यावसान शिवीगाळ आणि नंतर तुंबळ हाणामारीत झाले. संतापाच्या भरात राज खैरणार याने यश गायकवाड याला खाली पाडले आणि त्याच्या छातीवर बसून दगडाने त्याच्या तोंडावर एकापाठोपाठ एक सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात यश गायकवाड गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांची तत्पर कारवाई
या प्रकरणी समृद्धी विजय गायकवाड (रा. वडनेर रोड, विहितगाव) हिने नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आणि संशयित राज खैरणार याला बेड्या ठोकल्या. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास सुरू:
नाशिकरोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील बिडकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरवस्तीत आणि पहाटेच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तरुणांमधील वाढत्या हिंसक प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.