नाशकात माणुसकीला काळिमा... दोन महिलांवर बलात्कार... संशयित जेरबंद...

Share:
Main Image
Last updated: 25-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २५ एप्रिल - शहरात महिलांवरील अत्याचाराच्या दोन संतापजनक घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत लग्नाचे आमिष दाखवून विधवेवर सहा वर्षांपासून अत्याचार करण्यात आला, तर दुसऱ्या घटनेत नातेवाईकानेच विवाहितेची असहाय्यता पाहून तिला ब्लॅकमेल करत अत्याचार केला. याप्रकरणी आडगाव आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली आहे.

पहिली घटना: लग्नाचे आमिष दाखवून ६ वर्षे शोषण

जत्रा-नांदूर लिंक रोड परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय विधवा महिलेची पतीच्या निधनानंतर दीपक लक्ष्मण देवरे (रा. गंगापूर रोड) याच्याशी ओळख झाली होती. संशयिताने विवाहास संमती दर्शवत पीडितेचा विश्वास संपादन केला आणि गेल्या सहा वर्षांपासून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.

Advertisement

मात्र, पीडितेने जेव्हा लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा संशयिताने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला बेदम मारहाण केली आणि लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने आडगाव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत दीपक देवरे याला अटक केली आहे. उपनिरीक्षक ज्योती पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दुसरी घटना: नात्याने 'काळीमा' फासला; विवाहितेला ब्लॅकमेल

दुसरी घटना राजीवनगरमधील भगवती चौक परिसरात घडली आहे. येथील एका विवाहितेवर तिच्याच नात्यातील भूषण विनायक बोरसे (रा. साक्री रोड, धुळे) याने एप्रिल २०२४ पासून अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

संशयित भूषण हा पीडितेचा पती घरी नसल्याची संधी साधून तिथे येत असे. त्याने पीडितेला ब्लॅकमेल करत, शिवीगाळ व जीवे मारण्याची दमदाटी करून वारंवार अत्याचार केला. अखेर संशयिताचा जाच असह्य झाल्याने पीडितेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. उपनिरीक्षक सपना पुरी या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Comments

No comments yet.