नाशिक, (विशेष प्रतिनिधी) २४ एप्रिल - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहरांचा कायापालट होत असून, आता या दोन्ही शहरांना 'डिजिटल पायाभूत सुविधां'चे भक्कम बळ मिळणार आहे. कुंभमेळ्यातील गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा आणि दळणवळण सुलभ करण्यासाठी तब्बल ३८५ किलोमीटर लांबीचे ऑप्टिकल फायबर नेटवर्क (OFN) उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पामुळे आगामी कुंभमेळा हा केवळ धार्मिकच नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या बाबतीतही 'हायटेक' ठरणार आहे.
डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्णत्वाचे लक्ष्य
नाशिक महानगरपालिका आणि कुंभमेळा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर २०२५ मध्ये सुरू झाले असून, डिसेंबर २०२६ पर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीत शहरात सुरू असलेली खोदकामे ही याच प्रकल्पाचा भाग असून, आतापर्यंत १७१ किलोमीटरचे डक्टिंग पूर्ण झाले आहे. ९६-कोर क्षमतेच्या या नेटवर्कसाठी रिंग, मेष आणि लिनीअर अशा तिहेरी संरचनेचा वापर करण्यात येत आहे, जेणेकरून तांत्रिक बिघाड झाल्यास सेवा खंडित होणार नाही.
असे असेल 'डिजिटल' व्यवस्थापन
कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक एकाच वेळी नाशिकमध्ये दाखल होतात. अशा वेळी मोबाईल कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षिततेवर मोठा ताण येतो. हे फायबर नेटवर्क खालील यंत्रणांना आधार देईल:
सुरक्षा: ४,०११ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे या नेटवर्कला जोडले जाईल.
एआय यंत्रणा: कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित गर्दी विश्लेषण प्रणाली कार्यरत राहील.
आपत्कालीन यंत्रणा: सार्वजनिक सूचना आणि तातडीच्या संदेशांसाठी हे नेटवर्क कणा ठरेल.
नियंत्रण कक्ष: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील एकात्मिक नियंत्रण कक्षांमधून रिअल-टाइम मॉनिटरिंग केले जाईल.
महापालिकेला उत्पन्नाची मोठी संधी
हा प्रकल्प केवळ कुंभमेळ्यापुरता मर्यादित नसून, नाशिकसाठी ही दीर्घकालीन गुंतवणूक ठरणार आहे. यातील अतिरिक्त फायबर आणि डक्ट क्षमता खासगी दूरसंचार कंपन्यांना भाड्याने दिली जाईल. यातून महापालिकेला स्थिर उत्पन्न मिळेल आणि प्रकल्पावर झालेली गुंतवणूक पुढील ५ ते ७ वर्षांत वसूल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
"सिंहस्थ २०२७ मध्ये भाविक मोबाईल कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल सेवांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतील. या सेवा अखंडित राहाव्यात यासाठी हे जाळे मैलाचा दगड ठरेल."
— शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण
"हे नेटवर्क शहरासाठी दीर्घकालीन पायाभूत गुंतवणूक आहे. कुंभमेळ्यानंतरही नाशिकच्या दैनंदिन नागरी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी याचा उपयोग होईल."
— मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महानगरपालिका
प्रकल्पाचे 'स्मार्ट' वैशिष्ट्ये
एकूण लांबी: ३८५ किलोमीटर.
सद्यस्थिती: १७१ किमी डक्टिंग पूर्ण.
सुरक्षा कवच: ४,०११ हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही.
तंत्रज्ञान: एआय आधारित क्राउड मॅनेजमेंट.
कनेक्टिव्हिटी: ९६-कोर हाय-स्पीड ऑप्टिकल फायबर.
उपयोगिता: वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन प्रतिसाद आणि नागरी सेवा.