येवला मतदारसंघातील रुग्णांना आता घरपोच आरोग्य सेवा... पूर्ण मतदारसंघात सर्व्हे करण्याच्या माजी खासदार समीर भुजबळ यांच्या सूचना

Share:
Main Image
Last updated: 24-Apr-2026

येवला, (प्रतिनिधी) २४ एप्रिल - महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या 'पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम' येवला मतदारसंघात यशस्वीपणे राबविण्यात यावा. एक महिन्यात आरोग्य सर्व्हे पूर्ण करून रुग्णांना घरपोच सेवा सुरू करण्यात यावी. तसेच आयुष्यमान भारत योजने अंतर्गत  गोल्डन कार्ड काढण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात यावे अशा सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार 'पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम' व  आयुष्यमान योजनेच्या कामकाजाबाबत आज येवला संपर्क कार्यालयात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. सदर बैठकीत माजी खासदार समीर भुजबळ यांनी योजनेचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तारु, डॉ.अमोल काकड, डॉ.सुनील मोरे, डॉ.निकिता मोहिते, डॉ.अक्षय नवघिरे, डॉ.गीतांजली अंबाड यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांचे विशेष कार्य अधिकारी व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाकडून गंभीर आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त, तसेच आयुष्याच्या अंतिम टप्प्यातील रुग्णांना घरीच उपचार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने विशेष उपक्रम सुरू केला आहे. या 'पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम' अंतर्गत येवला मतदारसंघातील रुग्णांना घरपोच आरोग्यसेवा दिली जाणार आहे. या मोहिमेमुळे अंथरुणाला खिळलेल्या, कर्करोग, एड्स, दीर्घकालीन अपंगत्व तसेच मानसिक आजारांनी त्रस्त रुग्णांना रुग्णालयात जाण्याची गरज कमी होणार आहे. यामध्ये गृहभेटीद्वारे उपचार व संदर्भसेवा देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत समुदाय आरोग्य अधिकारी आणि आशा कार्यकर्त्या घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी व सेवा देणार आहेत. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पुढील महिनाभरात संपूर्ण मतदारसंघात आरोग्य सर्व्हे करून तातडीने रुग्णांना उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

डॉक्टरांची टीम जाईल रुग्णाच्या घरी....

या योजने अंतर्गत दरमहा या रुग्णांना फॉलोअप गृहभेटी देखील दिल्या जाणार आहे. हा कार्यक्रम नियमित कार्यक्रमांमध्ये समाविष्ट झाला आहे. डॉक्टर आणि त्यांची टीम घरी जाईल. या रुग्णांसाठी घरी 'विशेष होम केअर किट' देण्यात येईल त्यात बँडेज, जखमा कमी करण्यासाठी मलम, संबंधित औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

या रुग्णांना मिळणार योजनेचा फायदा....

Advertisement

या योजनेअंतर्गत कर्करोग, एड्स किंवा अंथरुणाला खिळलेल्या, दीर्घकालीन अपंगत्व आलेले, दीर्घकालीन मानसिक आजार, अंतिम टप्प्यातील रुग्णांसाठी अनेक पॅलिएटिव्ह केअर सेंटर्स उपलब्ध आहेत. त्यात प्रामुख्याने वेदना व्यवस्थापन, समुपदेशन आणि शुश्रूषेचा समावेश आहे. या पॅलिएटिव्ह केअर सेंटरच्या माध्यमातून असाध्य आजारांच्या रुग्णांना होणारा शारीरिक त्रास कमी करणे, मानसिक आधार देणे, रुग्णालयाचा खर्च कमी करणे, वेदनामुक्त जगता यावे, यासाठी ही सेवा अतिशय महत्त्वाची असणार आहे.

या योजनेअंतर्गत गंभीर आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त, तसेच आयुष्याच्या अंतिम टप्प्यातील रुग्णांना गंभीर आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त, तसेच आयुष्याच्या अंतिम टप्प्यातील रुग्णांची नोंदणी करून या रुग्णांना घरीच रुग्णसेवा देण्यात येणार आहे. यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे.

त्याचबरोबर यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी आयुष्यमान भारत योजनेचा आढावा घेतला. येवला मतदारसंघात आयुष्यमान भारत योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. त्याकरिता जास्तीत जास्त आयुष्यमान आभा कार्ड व गोल्डन कार्ड काढणे यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात यावे अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच यावेळी येवला तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच तालुका आरोग्य केंद्र यांचा घेऊन माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.  या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा पुढील काही दिवसांत निर्माण करून दिल्या जातील. त्याचबरोबर आशा सेविकांच्या प्रश्नांवरती तातडीने तोडगा काढण्याबाबत त्यांनी आश्वाशीत केले.

येवला संपर्क कार्यालयात सुरू होणार वैद्यकीय मदत कक्ष

केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक आभा कार्ड, गोल्डन कार्ड तसेच आवश्यक कागदपत्रे व मार्गदर्शन करण्यासाठी येवला संपर्क कार्यालयात स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून आरोग्य योजनांची माहिती तसेच कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Comments

No comments yet.