नाशिक, (प्रतिनिधी) २४ एप्रिल - मेंदू आणि मणक्याचे विकार हे अत्यंत गंभीर आणि खर्चिक मानले जातात. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांना या व्याधींतून मुक्त करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील एसएमबीटी हॉस्पिटल एक आशेचा किरण ठरले आहे. गेल्या दोन वर्षांत या विभागाने डॉ. हितेंद्र गडकरी यांच्या नेतृत्वाखाली २१ हजारांहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी व सल्ला मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, या कालावधीत ७०० पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या. या सर्वच शस्त्रक्रिया या अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या स्वरूपाच्या यशस्वी करण्यात आल्याचे डॉ हितेंद्र गडकरी यांनी सांगितले.
प्रख्यात मेंदू आणि मणकेविकार तज्ज्ञ डॉ. हितेंद्र गडकरी यांनी केवळ समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडेल अशा दरात आरोग्यसेवा मिळावी, या उदात्त हेतूने दोन वर्षांपूर्वी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये पदभार स्वीकारला. डॉ. गडकरी यांना मेंदू आणि मणकेविकार शस्त्रक्रियांचा ३० वर्षांपेक्षा अधिक दांडगा अनुभव आहे. नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव आणि गुजरातमध्ये त्यांनी सेवा बजावली असून, काही वर्षे त्यांनी परदेशातही आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आज दुर्गम भागातील रुग्णांना मिळत आहे.
एसएमबीटी येथील उपचार पद्धतीवर विश्वास ठेवून केवळ उत्तर महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भिवंडी, शहापूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, जुन्नर आणि पुणे परिसरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी आपले रुग्ण याठिकाणी रेफर केले आहेत. अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात या केंद्राबद्दल मोठी विश्वासार्हता निर्माण झाली आहे. मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रियांचा खर्च लाखांच्या घरात असतो. मात्र, एसएमबीटीमध्ये हे उपचार शासकीय योजनांमध्ये समाविष्ट असल्याने रुग्णांना कोणताही आर्थिक भार सोसावा लागत नाही. "पैशाअभावी कोणाचेही उपचार थांबू नयेत," हे रुग्णसेवेचे ब्रीद याठिकाणी प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये डॉ. गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने मेंदूतील गाठी काढणे (Brain Tumor), मेंदूतील रक्तवाहिनी फुगल्यास केली जाणारी ‘अॅन्युरिझम क्लिपिंग’, मणक्यातील गादी सरकल्याने नसांवर येणारा दाब काढण्याची ‘मायक्रो-डिसेक्टोमी’ आणि पाठीच्या कण्याला आधार देणारी ‘स्पाइनल फिक्सेशन’ यांसारख्या अवघड शस्त्रक्रियांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या सर्व महागड्या शस्त्रक्रिया ‘आयुष्मान भारत’ योजने’अंतर्गत समाविष्ट असल्याने रुग्णांना त्या मोफत उपलब्ध होत आहेत. अपघातामुळे डोक्याला झालेली गंभीर दुखापत असो किंवा मणक्याचे फ्रॅक्चर, शासकीय योजनेच्या आधारामुळे गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना लाखांचा आर्थिक भार सोसावा न लागता जागतिक दर्जाचे उपचार मिळत आहेत. यामुळेच गुंतागुंतीच्या आजारांसाठी हे रुग्णालय आता उत्तर महाराष्ट्रातील एक हक्काचे केंद्र बनले आहे.
शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी केवळ तज्ज्ञ डॉक्टर असून चालत नाही, तर तिथली व्यवस्थाही तितकीच महत्त्वाची असते. एसएमबीटीमध्ये २०० पेक्षा अधिक आयसीयू बेड्स, १७ अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स आणि मेंदू व मणक्याच्या रुग्णांसाठी स्वतंत्र सुसज्ज अतिदक्षता विभाग उपलब्ध आहेत. या रुग्णांची काळजी घेण्यासाठी विशेष प्रशिक्षित सपोर्टिंग आणि नर्सिंग स्टाफ उपलब्ध आहे, ज्यामुळे आजार बरे होण्याचे प्रमाण अधिक असून रुग्ण लवकर डिस्चार्ज घेऊन घरी परतत आहेत.
दुर्बिणीद्वारे आणि लेझरद्वारे लवकरच मेंदू व मणकेविकार शस्त्रक्रिया
भविष्यात रुग्णांना अधिक प्रगत सेवा देण्यासाठी एसएमबीटी हॉस्पिटलतर्फे प्रयत्न केले जात आहेत. लवकरच या ठिकाणी दुर्बिणीद्वारे आणि लेझरद्वारे मेंदू व मणकेविकार शस्त्रक्रिया सुरू होणार आहेत. तसेच, नवीन सर्जनना घडवण्यासाठी 'सर्जरी फेलोशिप' देखील सुरू करण्यात आली असल्यामुळे आरोग्यसेवा, शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रात एसएमबीटी हॉस्पिटल मानबिंदू ठरणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि अनुभवी डॉक्टरांची टीम यामुळे आम्ही कितीही क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडू शकतो. - सचिन बोरसे, संचालक, आरोग्यसेवा
मेंदू आणि मणकेविकारावर उपचार महागडे आहेत, परंतु एसएमबीटी हॉस्पिटल अशी एक जागा आहे, जिथे बहुतांश उपचार शासकीय योजनेअंतर्गत मोफत होतात तर योजनेत न बसणारे उपचार अतिशय माफक दरात होतात. गेल्या ३० पेक्षा अधिक वर्षापासून मेंदू आणि मणकेविकार उपचार करत आहे. मेंदू आणि मणकेविकार अतिशय क्लिष्ट आणि अवघड असतातच शिवाय ते खूप घातकही असतात. त्यामुळे आजार अंगावर न काढता लक्षणे जाणवू लागताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. हितेंद्र गडकरी, मेंदू आणि मणकेविकार तज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल