नाशिक, (प्रतिनिधी) २४ एप्रिल - नाशिक महानगरपालिकेच्या सहा प्रभाग समित्यांच्या सभापती पदासाठी अखेर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या ३० एप्रिल २०२६ रोजी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, अपर विभागीय आयुक्त तथा आयुक्त अजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निवडणूक कार्यक्रम राबवला जाणार आहे. प्रशासकीय स्तरावर या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, एकाच दिवशी सहाही विभागांचे निकाल स्पष्ट होणार आहेत. सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ६:३० वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पार पडेल.
असा असेल निवडणुकीचा वेळ आणि कार्यक्रम:
निवडणूक प्रक्रियेसाठी प्रत्येक विभागाला स्वतंत्र वेळ देण्यात आली आहे. नाशिक पूर्व विभागातून या प्रक्रियेला सुरुवात होईल, तर नाशिकरोड विभागाने सांगता होईल.
विभाग (प्रभाग समिती) मतदानाची वेळ
नाशिक पूर्व सकाळी १०:०० ते ११:००
नाशिक पश्चिम सकाळी ११:३० ते १२:३०
पंचवटी दुपारी ०१:०० ते २:००
नवीन नाशिक दुपारी २:३० ते ३:३०
सातपूर दुपारी ४:०० ते ५:००
नाशिकरोड सायंकाळी ५:३० ते ६:३०
राजकीय हालचालींना वेग
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच महापालिकेतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सभापती पदावर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. आयुक्त अजय मोरे स्वतः या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. ३० एप्रिलला होणाऱ्या या निवडींकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून आहे.