मुंबई, (प्रतिनिधी) २३ एप्रिल - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फोडले आहे. ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर एका कट्टरपंथी लेखकाचा संदर्भ देत, भारताचा उल्लेख 'नरक' (Hell Hole) असा करणाऱ्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला आहे. या दुटप्पी भूमिकेमुळे जागतिक स्तरावर, विशेषतः भारतीय समुदायामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
कट्टरपंथी अमेरिकन लेखक आणि समालोचक माइकल सॅवेज यांनी १ एप्रिल रोजी 'बर्थराइट सिटिझनशिप' (जन्मसिद्ध नागरिकता) विषयावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये अमेरिकेच्या नागरिकत्व कायद्यावर टीका करताना सॅवेज यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधाने केली होती. सॅवेज म्हणाले होते की, "लोक गरोदरपणाच्या नऊ महिन्यांत अमेरिकेत येतात, येथे बाळ जन्माला येते आणि ते नागरिक बनते. त्यानंतर ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला चीन, भारत किंवा पृथ्वीवरील इतर कोणत्याही नरकातून (Hell Hole) येथे घेऊन येतात."
ट्रम्प यांची चिथावणीखोर साथ
विशेष म्हणजे, ज्या व्हिडिओला फारसे व्ह्यूज नव्हते, त्यातील भारतविरोधी मजकूर ट्रम्प यांनी अक्षरश: चार पानांत लिहून आपल्या 'ट्रुथ सोशल' प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर असलेल्या व्यक्तीने अशा वांशिक आणि द्वेषपूर्ण विधानांना प्रसिद्धी दिल्याने, त्यांनी एकप्रकारे या विचारांवर आपली मोहोर उमटवली असल्याचे मानले जात आहे.
भारताबाबत दुटप्पी भूमिका?
एकीकडे भारतासोबतचे संबंध सुधारण्याचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या मैत्रीचे दावे करणाऱ्या ट्रम्प यांनी, दुसरीकडे भारताचा अपमान करणाऱ्या पोस्टला पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सॅवेज यांनी पुढे असेही म्हटले की, स्थलांतरितांची अमेरिकेबद्दल निष्ठा उरलेली नाही आणि अनेक ठिकाणी आता इंग्रजीही बोलली जात नाही.
भारतीय समुदायात तीव्र पडसाद
CNBC ला दिलेल्या मुलाखतीत महागाई आणि नागरिकत्वाबाबत दावे केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी हे वंशभेदी विधान रिपोस्ट केले आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेतील प्रभावशाली भारतीय-अमेरिकन मतदार आणि जागतिक स्तरावर भारताच्या मित्रराष्ट्रांमध्ये नाराजी पसरली आहे.
?s=20