मानधनाऐवजी आता मिळणार पूर्ण वेतन... या जिल्ह्यांतील प्राध्यापकांना मिळणार 'यूजीसी' वेतनश्रेणीचा लाभ...

Share:
Main Image
Last updated: 23-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २३ एप्रिल - राज्यातील सात जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या आदर्श महाविद्यालयांतील (Model Colleges) शिक्षकांसाठी राज्य सरकारने आज आनंदाची बातमी दिली आहे. या महाविद्यालयांतील शिक्षकांना आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) निर्देशानुसार मूळ वेतन आणि महागाई भत्ता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या शिक्षकांना शासकीय पदभरतीमध्ये १० अतिरिक्त गुण देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

न्यायालयीन लढ्याला यश
केंद्राच्या अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जालना (घनसावंगी), बुलढाणा, रायगड (श्रीवर्धन), हिंगोली, गडचिरोली, रत्नागिरी (आंबवडे) आणि सिंधुदुर्ग (तळेरे) या सात जिल्ह्यांत आदर्श महाविद्यालये सुरू करण्यात आली होती. या महाविद्यालयांमध्ये सध्या १३४ शिक्षक तासिका तत्त्वावर (CHB) आणि ६१ शिक्षकेतर कर्मचारी ठोक वेतनावर कार्यरत आहेत. सेवेत कायम करण्याबाबत या कर्मचाऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत सरकारने आता या शिक्षकांना सहाय्यक प्राध्यापकांचे मूळ वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.

भरतीमध्ये प्राधान्य आणि अनुभवाचा सन्मान
केवळ आर्थिक लाभच नव्हे, तर या शिक्षकांच्या भविष्यातील करिअरसाठीही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आगामी पदभरतीमध्ये या शिक्षकांना त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळावा म्हणून १० अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत. यामुळे या अनुभवी शिक्षकांना कायमस्वरूपी पदावर येण्याची संधी मिळणार आहे.

Advertisement

महाविद्यालयांच्या सक्षमीकरणासाठी इतर महत्त्वाचे निर्णय:
नव्या नियुक्त्या: सातही महाविद्यालयांना अनुभवी नेतृत्व मिळावे यासाठी प्रत्येकी एक प्राचार्य आणि मानद प्राध्यापक नियुक्तीच्या धोरणास मान्यता.
आर्थिक तरतूद: केंद्राचा हिस्सा वगळता, राज्याच्या हिश्श्याची आवश्यक आर्थिक तरतूद करण्यास मंत्रिमंडळाची संमती.
विद्यार्थी संख्या: सध्या या महाविद्यालयांमधील ४३ अभ्यासक्रमांमध्ये २ हजार ५१० विद्यार्थी शिक्षण घेत असून, विद्यार्थी संख्येच्या वाढीनुसार शिक्षकांच्या तरतुदींचे नियोजन केले जाणार आहे.

जिल्ह्यानिहाय कार्यरत महाविद्यालये:
१. जालना (घनसावंगी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्न.
२. बुलढाणा: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न.
३. रायगड (श्रीवर्धन): SNDT महिला विद्यापीठ संलग्न.
४. हिंगोली: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ संलग्न.
५. गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठ संलग्न.
६. रत्नागिरी (आंबवडे) व सिंधुदुर्ग (तळेरे): मुंबई विद्यापीठ संलग्न.

या निर्णयामुळे दुर्गम आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होणार असून, वर्षानुवर्षे तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

Comments

No comments yet.