सिंहस्थाच्या या कामांसाठी १०६३ कोटींचा निधी मंजूर...  मुख्यमंत्र्यांकडून कामांचा आढावा....

Share:
Main Image
Last updated: 23-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २३ एप्रिल - नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्य सरकारने १०६३ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. भाविकांना उत्तम सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी पायाभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचबरोबर विदर्भाच्या दळणवळणाला गती देणाऱ्या नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली आणि नागपूर-चंद्रपूर या तीन नवीन द्रुतगती महामार्गांचे वेळापत्रक निश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

कुंभमेळ्यासाठी सुविधांचे जाळे विणणार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी वाहनतळ, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन आणि मुख्य नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. या कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या १०६३ कोटींच्या निधीतून शहराचा कायापालट केला जाणार आहे. कुंभमेळा विकास प्राधिकरणाने ही कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

विदर्भात महामार्गांचे त्रिकोण; दळणवळणाला मिळणार बळ
विदर्भातील उद्योग आणि दळणवळणाला चालना देण्यासाठी तीन महत्त्वाच्या महामार्गांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी 'हुडको'कडून कर्ज घेण्याच्या प्रस्तावावर वित्त विभागाशी समन्वय साधण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement

महामार्गांची सविस्तर माहिती:
महामार्गाचे नाव लांबी (कि.मी.) भूसंपादन खर्च (कोटी) एकूण अंदाजित खर्च
नागपूर-गोंदिया १६२.५७ ३,१६२.१८ १९,५८२.१९ कोटी
नागपूर-चंद्रपूर २०४.७९ २,३५३.९४ -
भंडारा-गडचिरोली ९४.२४ ९३१.१५ -

सहा वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
हे तिन्ही प्रकल्प पुढील सहा वर्षांत पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रिया आणि पूर्णतेचा कालावधी निश्चित करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) देण्यात आले आहेत. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, नगरविकासचे डॉ. एच. गोविंदराज, एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते.

?s=20

Comments

No comments yet.