'बाहेरची बाधा' काढण्याच्या बहाण्याने लुटली अब्रू...  नाशिकच्या 'प्रतिगाणगापूर' मठातील भोंदूचे काळे कृत्य उघड...

Share:
Main Image
Last updated: 23-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २३ एप्रिल - दैवी शक्तीचा दावा करून आणि संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या अगतिकतेचा फायदा घेऊन एका महिलेचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू महेशगिरी काकडे याच्याविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) मध्यस्थीनंतर हा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेचे कुटुंबीय घरगुती समस्या आणि मुलीच्या लग्नातील अडथळ्यांमुळे त्रस्त होते. यावर उपाय शोधण्यासाठी ते निफाड तालुक्यातील धरणगाव (खडक) येथील महेश गिरी याच्या 'प्रतिगाणगापूर' नावाच्या मठात गेले. तिथे भोंदू महेशगिरीने महिलेला 'बाहेरची बाधा' असल्याचे सांगून भीती घातली. तिचे पाप धुण्यासाठी तिला पापनाशक कुंडात अंघोळ घालण्यास सांगून ओल्या वस्त्रानिशी उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा मारण्यास भाग पाडले.

Advertisement

लॉजवर नेऊन अत्याचार
काही दिवसांनी या भोंदूने महिलेला व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. 'दैवी विधी' आणि मार्गदर्शनासाठी तिला एकांतात भेटावे लागेल, असे त्याने तिच्या पालकांना पटवून दिले. पालकांनी विश्वासाने मुलीला नाशिकला पाठवले. त्यानंतर महेशगिरीने तिला नाशिक-त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेले. गळ्यातील रुद्राक्षाची आणि दैवी कोपाची भीती दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केला. या कृत्यानंतर तो पुण्यातील आपल्या दुसऱ्या मठाकडे निघून गेला.

अंनिसच्या मदतीने पोलिसांत धाव
घडलेल्या प्रकारामुळे हादरलेल्या पीडितेने महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे आणि राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे यांच्याकडे आपली आपबिती कथन केली. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ पीडितेला धीर देत लासलगाव पोलीस स्टेशन गाठले. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वस्तुस्थितीची पडताळणी केली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आरोपी महेशगिरी काकडे याच्यावर बलात्कार तसेच जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

इतर पीडितांनी पुढे येण्याचे आवाहन
"या भोंदूने स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा बनाव करून अशाच प्रकारे अनेक महिलांचे शोषण केले असण्याची शक्यता आहे. त्याला या कृत्यत मदत करणाऱ्यांनाही सहआरोपी करण्यात यावे. इतर कोणी पीडित महिला असल्यास त्यांनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे यावे," असे आवाहन अंनिसचे कृष्णा चांदगुडे आणि डॉ. टी. आर. गोराणे यांनी केले आहे. या मोहिमेत कोमल वर्दे आणि अ‍ॅड. स्वाती तेलगोटे यांनीही सहकार्य केले.

Comments

No comments yet.