नाशिक (प्रतिनिधी) २२ एप्रिल - शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरात दुचाकीस्वार भामट्यांचा सुळसुळाट वाढला असून, आता उबेर कारची प्रतीक्षा करणाऱ्या एका महिलेचा महागडा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी सलोनी प्रज्योत संचेती (रा. काश्मिरा गार्डन, राका कॉलनी) या रविवारी (दि. १९) रात्री आपली बहीण हिताश्री बेदमुथा हिच्यासह एका कार्यक्रमासाठी जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. गंगापूर रोडवरील राणे डेअरी परिसरातील एका मेडिकलसमोर त्या उभ्या होत्या. त्यांनी प्रवासासाठी उबेर कार बुक केली होती आणि त्या गाडीची प्रतीक्षा करत होत्या.
पल्सरवरून आले अन् मोबाइल लंपास केला
सलोनी संचेती या उबेरची वाट पाहत असताना मोबाइलवर बोलत उभ्या होत्या. याच वेळी पाठीमागून पल्सर दुचाकीवर डबलसीट आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. काही कळण्याच्या आत दुचाकीवरील एकाने सलोनी यांच्या हातातील महागडा मोबाइल अत्यंत वेगाने हिसकावून घेतला आणि राणे डेअरी परिसरातील गल्लीबोळातून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दोन्ही बहिणींना धक्का बसला.
पोलिसात धाव
या घटनेनंतर सलोनी संचेती यांनी तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भामट्यांचा शोध घेतला जात आहे.
रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभे राहून मोबाइलवर बोलताना किंवा कॅबची वाट पाहताना नागरिकांनी विशेषतः महिलांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
रिक्षात मंगळसूत्र लांबवले
रिक्षा प्रवासात महिलेच्या गळ््यातील मंगळसुत्र सहप्रवासी असलेल्या चोरट्यांनी हातोहात लांबविले. हा प्रकार पाथर्डी फाटा ते निमाणी बसस्थानक दरम्यान घडला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकूंद बाबुराव शेजवळ (६५ रा. प्रशांतनगर पाथर्डी फाटा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेजवळ दांम्पत्य रविवारी (दि.१९) निमाणी भागात गेले होते.
बाहेरगावी जाण्यासाठी ते पाथर्डी फाटा येथून रिक्षात बसले होते. यावेळी रिक्षात अन्य प्रवास करीत होते. निमाणी बसस्थानकाच्या दिशेने रिक्षा जात असतांना वाटेत दांम्पत्याचे लक्ष नसल्याची संधी साधत भामट्यांनी शेजवळ यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे ३५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हातोहात लांबविले. हवालदार देवरे तपास करीत आहेत.
नाशिकरोडला घरफोडी
नाशिकरोड येथील गायकवाड मळ््यात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे एक लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ६० हजाराच्या रोकडसह चांदीच्या ग्लास व कॅमेराचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रशेखर काशिनाथ शिंदे (रा.चक्रवर्ती हौ.सोसा.रेझिमेंटल प्लाझा मागे,गायकवाडमळा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिंदे कुटूंबिय सोमवारी (दि.२०) विवाह सोहळ््यानिमित्त बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली ६० हजाराची रोकड, दोन चांदीचे ग्लास आणि निकॉन कंपनीचा कॅमेरा असा एक लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला. जमादार शेजवळ तपास करीत आहेत.