शेजाऱ्याच्या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी झाली माता... विनयभंगाच्याही तीन घटनांनी नाशिक शहरात खळबळ...

Share:
Main Image
Last updated: 22-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २२ एप्रिल - शहरात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भद्रकाली परिसरात एका अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अत्याचारातून पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. यासह चोपडा लॉन्स, उपनगर आणि नाशिकरोड भागात विनयभंगाचे तीन गंभीर गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांनी संशयितांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली आहे.

दिवाळीच्या फराळाला गेली अन् घात झाला
पहिली घटना भद्रकालीतील अमरधाम रोडवरील काजी गल्लीत घडली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या फराळ देण्यासाठी पीडित अल्पवयीन मुलगी शेजारी राहणाऱ्या आकाश गुप्ता (२८) याच्याकडे गेली होती. यावेळी आकाशने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे पीडिता गर्भवती राहिली आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, दुर्दैवाने नवजात मुलीचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण उघडकीस आले. घरच्यांनी पोलिसांत धाव घेण्यात आली. भद्रकाली पोलिसांनी आकाश गुप्ता याला अटक केली आहे. त्याच्यावर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक प्रतापसिंग दहिफळे तपास करत आहेत.

Advertisement

पैसे मागितले म्हणून विनयभंग; संशयिताकडे सापडला 'चॉपर'
दुसरी घटना चोपडा लॉन्स परिसरात घडली. पीडितेने संशयित अनिकेत शंकर वरूडे (रा. कामटवाडे) याला ३० हजार रुपये हातउसने दिले होते. मंगळवारी (दि. २१) सायंकाळी पीडितेने आपल्या हक्काच्या पैशांची मागणी केली. संतप्त अनिकेतने तिला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिचा विनयभंग केला. पीडितेने प्रसंगावधान राखून पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अनिकेतची झडती घेतली असता त्याच्याकडे धारदार चॉपर मिळून आला. सरकारवाडा पोलिसांनी त्याच्यावर विनयभंग आणि शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

कौटुंबिक वादातून घरात घुसून मारहाण
तिसरी घटना नाशिकरोड येथील धोबी मळा भागात घडली. पूर्ववैमनस्यातून बुवा कुटुंबातील सदस्यांनी पीडितेच्या घरात घुसून 'पोलीसातील तक्रार मागे घे' असे म्हणत तिला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या प्रकरणी आदेश बुवा याने विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. उपनगर पोलिसांनी आदेश बुवासह इतर ९ नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

रस्त्यात अडवून विवाहितेची छेडछाड; ५ तोळ्यांचे मंगळसूत्र गहाळ
चौथी घटना वडनेर पिंपळगाव रोडवर घडली. पीडित विवाहिता मंगळवारी सायंकाळी आपल्या दुचाकीवरून जात असताना नितीन पोरजे (रा. वडनेर) याने तिची वाट अडवून विनयभंग केला. या झटापटीत विवाहितेचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र गहाळ झाले आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तपास करत आहेत.

Comments

No comments yet.