नाशिक, (प्रतिनिधी) २२ एप्रिल - शहरातील सातपूर औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात एका २२ वर्षीय तरुणावर जुन्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, संशयित आरोपीच्या मैत्रिणीने 'मार डालो इसको' म्हणत चिथावणी दिल्यानंतर हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न (IPC 307) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश अमरबहाद्दूर बोरा (वय २२, रा. अहिल्याबाई होळकर चौक, शिवाजीनगर) हा सोमवारी (दि. २०) रात्री शिवाजीनगर येथील साईबाबा गार्डनमध्ये बसलेला होता. यावेळी संशयित अरबाज शेख आणि त्याच्या साथीदारांनी गणेशला गाठले. जुन्या वादाची कुरापत काढून टोळक्याने प्रथम त्यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
'मार डालो इसको'ची चिथावणी
मारहाण सुरू असताना, संशयित अरबाजची मैत्रीण किशू हिने "मार डालो इसको, छोड़ो मत" अशी ओरडून चिथावणी दिली. या चिथावणीनंतर संशयितांनी अधिकच आक्रमक होत आपल्याकडील धारदार कोयता आणि चाकूने गणेशवर सपासप वार केले. या हल्ल्यात गणेश बोरा हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संशयितांची नावे:
पोलीस तपासाअंती खालील संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
१. अरबाज शेख
२. रजनिश प्रसाद उर्फ छोट्या
३. प्रणव जगताप
४. तुषार रसवे
५. सुमित पंडित
६. किशू (अरबाजची मैत्रीण)
तपासाची चक्रे फिरली:
या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. गंगापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. औद्योगिक वसाहतीतील वाढत्या गुन्हेगारीमुळे स्थानिक रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे.
रामकुंडावरही प्राणघातक हल्ला
सावलीत झोपलेल्या फिरस्त्यावर दोघांनी चाकू हल्ला केल्याची घटना रामकुंड भागात घडली. लुटमारीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला असून, यात ४५ वर्षीय फिरस्ता जखमी झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश काशिनाथ माळी (४५ मुळ रा. चोंढी मेंढी ता.सिन्नर हल्ली फिरस्ता गंगाघाट) असे जखमीचे नाव आहे.
माळी सोमवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास रामकुंड परिसरातील धार्मिक विधीच्या छत्रीमध्ये झोपलेले होते. अचानक आलेल्या दोन तरूणांनी कुठलेही कारण नसताना येथे का झोपला असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी भामट्यांनी त्यांची अंगझडती घेत असतांना माळी यांनी आरडाओरड करीत प्रतिकार केल्याने ही घटना घडली. संतप्त दोघांपैकी एकाने कमरेला लावलेला धारदार सुरा त्यांच्या पोटात खुपसला. या घटनेत माळी रक्ताच्या थारोळ्यात पडताच दुकलीने धूम ठोकली असून जखमी माळी यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हवालदार सोर तपास करीत आहेत.