मुंबई, (प्रतिनिधी) २१ एप्रिल - मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) 'ऑपरेशन पायरो हेस्ट' अंतर्गत एक मोठी कारवाई केली आहे. चिनी बनावटीच्या फटाक्यांची भारतात बेकायदेशीर तस्करी करणारे मोठे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले असून, सुमारे १७.०७ कोटी रुपये किमतीचे ७० मेट्रिक टन फटाके जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी तस्करी करणाऱ्या टोळीतील दोन महत्त्वाच्या व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
अशी राबवली मोहीम
विदेशी बनावटीच्या फटाक्यांची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती DRI च्या मुंबई विभागीय युनिटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी न्हावा शेवा बंदरात चार संशयास्पद कंटेनर्स अडवले. तपासादरम्यान, सीमाशुल्क तपासणी टाळण्यासाठी हे कंटेनर्स 'निरुपद्रवी वस्तू' (Innocuous goods) म्हणून घोषित करण्यात आले होते, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये.
रंगेहात पकडले आरोपी
तस्करांनी अतिशय चलाखीने कंटेनरचे अधिकृत 'सील' तोडून, त्यातील प्रतिबंधित फटाके दुसऱ्या वाहनात हलवण्याचा प्रयत्न केला. कंटेनर फ्रेट स्टेशनमध्ये हा माल चोरट्या मार्गाने काढून त्याऐवजी दुसरा माल भरला जात असतानाच DRI च्या पथकाने छापा टाकून आरोपींना रंगेहात पकडले.
सार्वजनिक सुरक्षिततेला धोका
भारतात विदेशी व्यापार धोरणांतर्गत फटाक्यांची आयात प्रतिबंधित आहे. यासाठी 'पेट्रोलियम आणि विस्फोटके सुरक्षा संघटने'चा (PESO) अनिवार्य परवाना आवश्यक असतो. अशा प्रकारे होणारी बेकायदेशीर आयात केवळ नियमांचे उल्लंघन नाही, तर सार्वजनिक आरोग्य, बंदर पायाभूत सुविधा आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण करते.
DRI ची वचनबद्धता
तस्करीच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि सुरक्षेला धक्का लावणाऱ्या टोळ्यांविरुद्ध DRI कडून सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. भारताची व्यापार आणि लॉजिस्टिक परिसंस्था सुरक्षित ठेवण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.