नाशिक, (प्रतिनिधी) २१ एप्रिल - शहरातील त्र्यंबक रोडवरील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये आयोजित प्रदर्शनात खरेदीच्या बहाण्याने हातसफाई करणाऱ्या माय-लेकींच्या टोळीला पकडण्यात स्टॉलधारकांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या तिघींची ओळख पटवून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
त्र्यंबक रोडवरील हॉटेल एमरॉल्ड पार्क येथे 'फॅशन इस्ट एक्झिबिशन' सुरू आहे. यात तिडके कॉलनीतील रहिवासी रंजना लक्ष्मण शिंदे यांनी 'सिरीज गॅलरी' या नावाने साडी आणि ड्रेस मटेरियलचा स्टॉल लावला होता. प्रदर्शन सुरू असताना संशयित महिला व तिच्या दोन मुलींनी स्टॉलवर गर्दीचा फायदा घेत ६ ड्रेस आणि २ साड्या, असा एकूण १९ हजार ८०० रुपयांचा माल चोरून नेला होता.
सीसीटीव्हीने दिली साथ
रात्री स्टॉलवरील मालाची मोजणी करताना काही कपडे कमी असल्याचे रंजना शिंदे यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने आयोजकांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक महिला आणि दोन तरुण मुली अत्यंत शिताफीने कपडे लंपास करताना दिसून आल्या. शिंदे यांनी हा व्हिडिओ इतर स्टॉलधारकांनाही दाखवून सतर्क केले होते.
चोरीची पुनरावृत्ती बेतली अंगाशी
रविवारी (दि. १९) सायंकाळी हेच तिन्ही चेहरे पुन्हा प्रदर्शनात खरेदीच्या बहाण्याने शिरले. मात्र, आधीच सतर्क असलेल्या स्टॉलधारकांनी त्यांना तात्काळ ओळखले. संशयितांची हालचाल टिपल्यानंतर खात्री पटताच त्यांना बसवून ठेवण्यात आले आणि तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले.
संशयित पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषाताई आहेर आणि त्यांच्या दोन मुली प्रतीक्षा व शीतल आहेर (सर्व रा. बुरकुले नगर, हनुमानवाडी) अशी ताब्यात घेतलेल्या माय-लेकींची नावे आहेत. या तिघींनी गुन्ह्याची कबुली दिली असून सरकारवाडा पोलीस ठाण्याचे हवालदार थेटे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.