'बंटी-बबली'ची हातचलाखी... थेट तोंडात टाकला सोन्याचा दागिना...  नाशिक सराफ बाजारात खळबळ...

Share:
Main Image
Last updated: 21-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २१ एप्रिल - ग्राहकांच्या वेषात येऊन व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या भामट्यांच्या नवनवीन क्लृप्त्या आता समोर येऊ लागल्या आहेत. नाशिकच्या आडगाव परिसरात एका 'बंटी-बबली' जोडीने दुकानदाराची नजर चुकवून चक्क सोन्याचा कानातील झुबा तोंडात लपवून लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
अनिकेत रवींद्र वडनेरे (रा. सीपीएम इस्टेट, जत्रा चौक) यांचे कोणार्क नगरमधील मोरेश्वर हाईट्स इमारतीत 'कुलस्वामिनी ज्वेलर्स' नावाचे दुकान आहे. रविवारी (दि. १९) दुपारी वडनेरे दुकानात असताना एक तरुण आणि तरुणी खरेदीच्या बहाण्याने तिथे आले. त्यांनी कानातील दागिने पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

Advertisement

अशी केली चोरी...
वडनेरे यांनी काउंटरवर दागिन्यांचे विविध प्रकार दाखवण्यास सुरुवात केली. यावेळी दागिन्यांची पाहणी करत असताना, दुकानदाराचे लक्ष थोडे विचलित झाल्याची संधी साधून संबंधित महिलेने अत्यंत शिताफीने सोन्याचा झुबा उचलला आणि थेट तोंडात टाकला. चोरी केल्याचा संशय येऊ नये म्हणून काही वेळ त्यांनी खरेदीचा बनाव करत 'टाईमपास' केला आणि नंतर 'पसंत पडले नाहीत' असे सांगून दोघेही दुकानातून पसार झाले.

तपास सुरू
दुकानदाराने जेव्हा दागिन्यांची आवराआवर सुरू केली, तेव्हा एक झुबा कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संशय आल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, महिलेचे कारस्थान उघड झाले. चोरीला गेलेला झुबा ३.८ ग्रॅम वजनाचा असून त्याची किंमत सुमारे ६० हजार रुपये आहे.

पोलीस कारवाई: याप्रकरणी अनिकेत वडनेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हवालदार अहिरे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.
व्यापाऱ्यांसाठी टीप: दागिने दाखवताना एकावेळी मर्यादित बॉक्स बाहेर काढावेत आणि संशयास्पद हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.