नाशिक, (प्रतिनिधी) १८ एप्रिल - लग्नाचे आमिष दाखवून एका आदिवासी तरूणीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या कामटवाडा परिसरात उघडकीस आला आहे. पीडितेकडून वेळोवेळी पैसे उकळूनही संशयिताने व त्याच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिल्याने अखेर हा प्रकार पोलीस ठाण्यात पोहोचला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मुख्य संशयितासह त्याच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध बलात्कार आणि अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी आणि संशयित शुभम तांबे यांचे सन २०२१ पासून प्रेमसंबंध होते. या काळात शुभमने पीडितेशी लग्न करण्याचे वचन दिले होते. याच आमिषाला बळी पाडून त्याने तरूणीवर वेळोवेळी बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे, संशयिताने पीडितेकडून वेळोवेळी आर्थिक लाभ घेत तिचे पैसेही उकळले.
कुटुंबीयांचाही लग्नास नकार
जेव्हा पीडितेने शुभमकडे लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्नास स्पष्ट नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरूणीने अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी याप्रकरणी खालील संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
शुभम तांबे (मुख्य संशयित)
वैभव तांबे
सुनिता तांबे
केतन तांबे
प्रकाश तांबे
(सर्व राहणार: जनकनगरी, कामटवाडा, नाशिक)
तपासाची चक्रे फिरली:
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
नाशिक : बसमध्ये चढतांना गर्दीची संधी साधत भामट्यांनी वृद्ध प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी हातोहात लांबविली. ही घटना निमाणी बसस्थानकात घडली. या घटनेत दीड तोळे वजनाच्या व सुमारे ९० हजार रूपये किमतीच्या सोनसाखळीवर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत झिप्रु मोरे (रा. खोडेमळा बडदेनगर सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मोरे गुरूवारी (दि.१६) बाहेरगावी जाण्यासाठी निमाणी बसस्थानकात गेले होते. दुपारच्या सुमारास ते मालेगाव बसमध्ये चढत असतांना ही चोरी झाली. गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ९० हजार रूपये किमतीची सोन्याची साखळी हातोहात लांबविली. हवालदार कोरडे तपास करीत आहेत.