नाशिक, (प्रतिनिधी) १८ एप्रिल - नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर फाटा परिसरात गुरुवारी पहाटे एका टोळक्याने फिल्मी स्टाईल पाठलाग करून ट्रक चालक आणि क्लिनरला बेदम मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धारदार कोयत्याचा धाक दाखवत संशयितांनी १० हजार रुपयांची रोकड लंपास केली असून, जाताना ट्रकची तोडफोडही केली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारने केला पाठलाग
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश वसंत वाघ (मूळ रा. जोपूळ, ता. चांदवड, हल्ली रा. कामटवाडा, सिडको) हे गुरुवारी (दि. १६) पहाटे आपल्या ताब्यातील आयशर ट्रक (क्रमांक MH 02 FG 5121) घेऊन नाशिकच्या दिशेने येत होते. शिंदे टोलनाक्यापासून एका पांढऱ्या रंगाच्या कारने (क्रमांक MH 01 AH 8072) त्यांच्या ट्रकचा पाठलाग सुरू केला.
शस्त्रांचा धाक आणि मारहाण
सिन्नर फाटा परिसरात संशयितांनी कार आडवी लावून ट्रक थांबवला. कारमधून उतरलेल्या टोळक्याच्या हातात लाठ्या-काठ्या आणि धारदार कोयते होते. त्यांनी चालक वाघ आणि क्लिनरला ट्रकच्या खाली ओढून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. "ओरडलात तर संपवून टाकू," अशी धमकी देत कोयत्याचा धाक दाखवून वाघ यांच्या खिशातील १० हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली.
जाताना केली तोडफोड
लूटमार केल्यानंतर या टोळक्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी ट्रकची समोरील काच फोडून नुकसान केले आणि कारमधून पोबारा केला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पोलीस तपास सुरू
या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि कारच्या क्रमांकावरून संशयितांचा शोध घेत आहेत.
अखेर त्या कामगाराचा मृत्यू
नाशिक : दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या हॉटेल कामगाराचा मृत्यू झाला. गेली दोन महिने कामगारावर उपचार सुरू होते. हा अपघात गंगापूररोडवरील पोलीस आयुक्तालया समोर झाला होता. या अपघातात भरधाव दुचाकी दुभाजकावर चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. सुजित गजेंदर राज (२१ रा. करीलिव हॉटेल जेहान सर्कल) असे मृत हॉटेल कामगाराचे नाव आहे.
सुजित राज व समाधान देवरे (वय ३२, मूळ रा. देऊर बु. जि. धुळे) हे दोघे हॉटेल कामगार गेल्या १७ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास एमएच १८ सीजे ०९१८ या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता.
गंगापूर रोडकडून अशोक स्तंभाच्या दिशेने दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना पोलिस आयुक्तालयासमोर चालकाचे भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल दुभाजकाला धडकून विजेच्या खांबावर आदळली होती. यात चालक समाधान देवरे याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सुजीत राज गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते. त्याचीही प्राणज्योत मालवली आहे.
याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृतचालक समाधान देवरे याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार खोडे तपास करीत आहेत.