नाशकाला पुन्हा 'एमडी'चा विळखा... गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई... दोन मोठ्या टोळ्यांचा पर्दाफाश...

Share:
Main Image
Last updated: 17-Apr-2026

नाशिक |(प्रतिनिधी) १७एप्रिल  -  शहरात पुन्हा एकदा 'मॅफेड्रोन' (MD) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शहरात विशेष मोहीम राबवत सातपूर आणि म्हसरूळ परिसरात दोन मोठ्या कारवाया केल्या. या कारवाईत एकूण चार पेडलरना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून वाहनांसह सुमारे ६ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

पहिली कारवाई: महात्मानगर पोस्ट ऑफिस परिसर

अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि. १५) रात्री महात्मानगर भागातील पोस्ट ऑफिसजवळ छापा टाकला. यावेळी संशयित कार्तिक बाळू वाघमारे (२०, रा. बोधलेनगर) आणि निरज निलेश बच्छाव (२१, रा. तपोवन रोड) हे दोघे एमडी ड्रग्ज विक्री करताना रंगेहाथ पकडले गेले. त्यांच्याकडून १० हजार रुपये किमतीची ड्रग्जची पुडी आणि अ‍ॅक्टिव्हा दुचाकी असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक न्हाळदे पुढील तपास करत आहेत.

दुसरी कारवाई: पेठरोडवरील हॉटेल राऊ परिसर

दुसरी मोठी कारवाई गुरुवारी (दि. १६) सायंकाळी पेठरोडवर करण्यात आली. हॉटेल राऊसमोर एका कारमध्ये (MH 43 AL 4242) बसून ड्रग्ज विक्री केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून निलेश बापू खैरणार (४४, रा. सटाणा) आणि सुमित अशोक धोईंजे (२८, रा. जेलरोड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ ग्रॅम मॅफेड्रॉन, कार, रोकड आणि मोबाईल असा एकूण ६ लाख ५८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Advertisement

तपासात मोठी नावे समोर
या तस्करीच्या चौकशीत मोहसीन मिर्झा आणि समीर वानखेडे या दोन संशयितांची नावे समोर आली असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक चौधरी तपास करत आहेत.

कारवाईतील पथक:
ही कारवाई पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, संदीप पवार, अंमलदार बळवंत कोल्हे, भारत डंबाळे, संतोष सैंदाणे, योगेश सानप व पथकाने यशस्वी केली.

Comments

No comments yet.