नाशिक, (प्रतिनिधी) १७ एप्रिल - शेतजमीन बळकावण्याच्या उद्देशाने शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला करत, उभ्या पिकात नांगर फिरवून नुकसान केल्याचा खळबळजनक प्रकार पिंपळगाव खांब शिवारात घडला आहे. याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासह ७ ते ८ जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दंगल आणि अनधिकृत प्रवेशासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेकी घटना काय?
वडनेर पाथर्डी रोड परिसरातील शेतकरी सुरेश रंगा बोराडे (५५) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दि. १४ ते १६ एप्रिल दरम्यान शिवाजी पांडुरंग चुंभळे (रा. लेखानगर) आणि त्यांच्या ६ ते ७ साथीदारांनी बोराडे यांच्या शेतात बेकायदेशीर प्रवेश केला. संशयितांनी बोराडे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रसंगावधान राखल्याने ते बचावले. यानंतर संशयितांनी त्यांना शेतातून पळवून लावले.
पुतण्याला जीवे मारण्याची धमकी
बोराडे यांचा पुतण्या योगेश हा घटनास्थळी असताना त्यालाही आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देऊन हुसकावून लावले. योगेशने तेथून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. केवळ हल्ल्यावरच न थांबता, संशयितांनी बोराडे यांच्या शेतातील उभ्या फ्लॉवरच्या पिकावर नांगर फिरवून पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. ही जमीन बळकावण्याच्या हेतूनेच हा सर्व राडा करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल
या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. उपनगर पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत संशयितांविरुद्ध खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे:
खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder)
बेकायदेशीर जमाव जमवणे व दंगल (Rioting)
गुन्हेगारी धमकी (Criminal Intimidation)
अतिक्रमण आणि मालमत्तेचे नुकसान
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सपकाळे करत आहेत. राजकीय क्षेत्रातील बड्या व्यक्तीचे नाव यात आल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.