जाचाला कंटाळून सराफ व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न... ९० लाखांच्या वसुलीवरून घरात घुसून दमदाटी...

Share:
Main Image
Last updated: 17-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १७ एप्रिल - हात उसनवार घेतलेली रक्कम परत करूनही उर्वरित पैशांसाठी सातत्याने होणारा तगादा, घरातील सदस्यांसमोर होणारा अपमान आणि धमक्यांमुळे एका सराफ व्यावसायिकाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना तारवालानगर भागात घडली आहे. याप्रकरणी नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरभरात एकच खळबळ उडाली आहे.

व्यवसायासाठी घेतले होते पैसे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश बाळकृष्ण दाभाडे (रा. लामखेडेमळा, तारवालानगर) या सराफ व्यावसायिकाने व्यवसायासाठी वर्षभरापूर्वी मुर्तडक यांच्याकडून सुमारे ९० लाख रुपये हातउसनवार घेतले होते. दाभाडे यांनी यातील काही रक्कम परत देखील केली होती. मात्र, उर्वरित पैशांच्या वसुलीसाठी मुर्तडक यांनी त्यांच्याकडे तगादा लावला होता.

Advertisement

रुग्णालयातही सोडली नाही पाठ
फिर्यादीनुसार, संशयितांनी दाभाडे यांना केवळ घरीच नाही, तर ते वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात दाखल असतानाही तिथे जाऊन पैशांसाठी दमदाटी केली. बुधवारी (दि. १५) पुन्हा दाभाडे यांच्या घरात घुसून कुटुंबीयांसमोर त्यांना शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. वारंवार होणाऱ्या या अपमानामुळे आणि मानसिक तणावामुळे दाभाडे यांनी घरात बाथरूममध्ये जाऊन फिनाइल प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला.

प्रकृती गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू
आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर प्रकृती बिघडल्याने दाभाडे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात जाऊन दाभाडे यांची चौकशी केली, त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments

No comments yet.