नाशिक, (प्रतिनिधी) १६ एप्रिल - महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी केंद्र शासनाने सखी वन स्टॉप सेंटर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केले आहे. अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर मदत, समुपदेशन व गरज असल्यास आश्रयाची सोय उपलब्ध व्हावी, या हेतुने केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून सुरु करण्यात आलेले सखी वन स्टॉप सेंटर महिलांसाठी सहाय्यभूत ठरले आहे. शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ, कौटुंबिक छळ, ॲसिड हल्ला किंवा सायबर क्राईममधील कोणत्याही अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना पोलीस, वकील, समुपदेशक अशा अनेकांची मदत घ्यावी लागते. अशा वेळी सखी वन स्टॉप सेंटर पिडीतेच्या पाठीशी उभी राहुन लढा देत त्यांना न्याय मिळवुन देण्याचे काम करीत आहे.
महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी केंद्र शासनाने सखी वन स्टॉप सेंटर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केले आहे. नाशिक जिल्ह्यात समाजकल्याण आवार, शासकीय अंध शाळे शेजारी नासार्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक - पुणे रोड, आवारात असलेल्या इमारतीत डिसेंबर 2019 पासुन सखी वन स्टॉप सेंटर सुरु करण्यात आले असून या सहा वर्षांच्या कालावधीत या सेंटरने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या मदतीने डिसेंबर 2019 ते मार्च 2026 या कालावधीत आजपर्यंत 1127 पिडीत महिलांच्या विविध समस्यांवर निवारण करुन त्यांना विविध सेवा उपलब्ध करुन देत न्याय देण्याचे कार्य केले आहे.
कौटुंबिक हिंसाचारासह लैंगिक शोषण, बालविवाह, हुंडाबळी, छळ, जाच, ॲसिड हल्ले, सायबर क्राइम आणि बाल लैंगिक शोषणग्रस्त पिडीतांनी नाशिक येथे सखी वन स्टॉप सेंटरमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक पी.एस.एच.जगताप यांनी केले आहे.
सहा प्रकारची केली जाते मदत
सखी वन स्टॉप सेंटर मार्फत पिडीत महिलांना सहा प्रकारची मदत केली जाते. यामध्ये कायदेशीर मदत, पोलीस मदत, समुपदेशन, वैद्यकीय मदत, तात्पुरता निवारा, व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा, पोलीस सहायता आदींचा समावेश आहे. हे कार्यालय पिडीत महिलांसाठी 24 x 7 सुरु असते. तसेच महिलांना केंद्रात आल्यावर शासकीय योजनांसंबंधी माहिती दिली जाते. त्याचबरोबर इतर काही अडचणी असतील तर त्याही समुपदेशनद्वारे सोडविल्या जातात. सखी वन स्टॉप सेंटरमध्ये आलेल्या अत्याचारग्रस्त व गरजू महिलांना निवाऱ्याची गरज असल्यास त्यांना सेंटरमार्फत पाच दिवसाचा तात्पुरता निवारा दिला जातो.
असे होते केंद्रातून काम
कौटुंबिक हिंसाचार किंवा इतर अत्याचारांना सामोरे जाणाऱ्या महिलांना एकाच छताखाली सर्व प्रकारची मदत मिळावी, यासाठी नाशिक जिल्ह्यात 'सखी वन स्टॉप सेंटर' (Sakhi One Stop Center) प्रभावीपणे कार्यरत आहे. मानसिकरित्या खच्चीकरण झालेल्या महिलांना पुन्हा उभारी देण्यासाठी येथे मोफत वैद्यकीय सेवा, पोलीस मदत, कायदेशीर सल्ला/मदत, तात्पुरता निवारा आणि समुपदेशन अशा सुविधा २४ तास पुरविल्या जात आहेत.
हे केंद्र जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या थेट नियंत्रणाखाली चालवले जाते. केंद्राच्या कामकाजासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून एका नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांना कोणत्याही वेळी मदत मिळावी यासाठी हे केंद्र २४ x ७ सुरू असून, त्यासाठी ९ कर्मचारी कार्यरत आहेत. केंद्राच्या संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी केंद्र व्यवस्थापकांकडे सोपवण्यात आली आहे.
कायदेशीर व तातडीची मदत:
अनेकदा पीडित महिलांना कायदेशीर प्रक्रियेची माहिती नसते. अशा महिलांना योग्य दिशा दाखवण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रात कायदेविषयक मार्गदर्शन उपलब्ध आहे. संकटग्रस्त महिला स्वतः प्रत्यक्ष येऊन, सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत किंवा पोलीस प्रशासनाच्या मदतीने या केंद्राशी संपर्क साधू शकतात.
१८१ हेल्पलाइनचा वापर करा:
तातडीच्या मदतीसाठी शासनाचा १८१ हा महिला हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित आहे. जिल्ह्यातील गरजू आणि संकटग्रस्त महिलांनी कोणत्याही भीतीशिवाय या क्रमांकावर किंवा सखी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनिल दुसाने, आणि सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक श्रीमती पी.एस.एच.जगताप यांनी केले आहे
सखी वन स्टॉप सेंटरचा पत्ता असा :
सखी वन स्टॉप सेंटर, समाजकल्याण आवार, शासकीय अंध शाळे शेजारी नासार्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक - पुणे रोड, नाशिक पिन - ४२२०११ दूरध्वनी क्रमांक ०२५३- २९५६३६८ येथे संपर्क साधावा.