नाशिक, (प्रतिनिधी) १६ एप्रिल - वाहन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याचे दोन धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आले आहेत. यात एका इसमाला ४५ हजार, तर दुसऱ्यास तब्बल २९ लाख ४५ हजारांना गंडविण्यात आले आहे. याप्रकरणी म्हसरूळ आणि गंगापूर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
पहिली घटना: 'OLX' वरील जाहिरात आली अंगलट
म्हसरूळ परिसरातील रहिवासी हरिष अमृतलाल दळवी यांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांनी आपली 'सियाज' कार (MH 01 CP 3895) विक्रीसाठी 'OLX' वर जाहिरात टाकली होती. ही जाहिरात पाहून संशयित संदीप घोलप उर्फ भाऊराव घोलप याने दळवी यांच्याशी संपर्क साधला. कारच्या कर्जाचे हप्ते भरण्याची हमी देत घोलप याने अॅग्रीमेंटद्वारे कार ताब्यात घेतली, मात्र त्यानंतर हप्ते न भरता दळवी यांची फसवणूक केली.
दुसऱ्या एका व्यवहारात, दळवी यांनी आपली 'रेनॉल्ड' कार (MH 15 JM 1104) शुभम पवार याच्या मध्यस्थीने सादिक शेख याला १ लाख ८० हजारांत ताबे गहाण म्हणून वापरण्यास दिली होती. यासाठी पवारला १६ हजार रुपये कमिशनही दिले, मात्र मुदत संपूनही सादिक शेखने वाहन परत केले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी शुभम पवार, सादिक शेख आणि संदीप घोलप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक मुंद्रुपकर तपास करत आहेत.
दुसरी घटना: विश्वास संपादन करून २९ लाखांची लूट
फसवणुकीचा दुसरा मोठा प्रकार गंगापूर रोडवरील सिरीन मेडोज भागात घडला. येथील रहिवासी श्रीकांत रघुनाथ कुंभार यांची राजेश पगार आणि कपिल मेमन या संशयितांनी फसवणूक केली. मार्च २०२५ मध्ये संशयितांनी कुंभार यांची 'इको स्पोर्ट' कार ६.५० लाखांत विकून देण्याचे आमिष दाखवून ताब्यात घेतली. त्यानंतर 'स्कोडा' कारच्या (MH 02 EU 0568) व्यवहारातही कुंभार यांचा विश्वास संपादन केला. या दोन्ही व्यवहारांत कुंभार यांना तब्बल २९ लाख रुपयांचा फटका बसला आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे तपास करत आहेत.