नाशिक, (प्रतिनिधी) १६ एप्रिल - शहरातील गंगापूर रोडवरील जेहान सर्कल परिसरात वाहतूक कोंडीत हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणावरून एका टोळक्याने दोन मित्रांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्यावर आणि कमरेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल आत्माराम खंदारे (२५, रा. संत कबीरनगर, कॅनल रोड) आणि त्याचा मित्र निलेश तोडे हे दोघे मंगळवारी (दि. १४) रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी जात होते. जेहान सर्कलजवळील दूध डेअरी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी रस्ता मिळावा यासाठी खंदारे यांनी हॉर्न वाजवला.
टोळक्याची बेदम मारहाण
हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने पुढील वाहनचालकाने जाब विचारला. त्यानंतर चार ते पाच दुचाकींवरून डबल आणि ट्रिपल सीट आलेल्या टोळक्याने दुचाकीवरून खाली उतरत खंदारे आणि तोडे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले आणि संशयितांनी निलेश तोडे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात तोडे गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी अनिल खंदारे याने दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांनी संशयित टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक निरीक्षक निखिल पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.