छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) १६ एप्रिल - छत्रपती संभाजीनगर महापालिकेची इमारत कब्रस्तानच्या जागेवर असल्याने तिथे 'आत्मे' दिसतात, या महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानावर आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मंत्र्यांचे हे विधान अवैज्ञानिक, धक्कादायक आणि भीती पसरवणारे असून, त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अंनिसने केली आहे.
कायद्याचे रक्षकच बनले भक्षक?
महाराष्ट्र अंनिसने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ज्या सामाजिक न्याय विभागाने देशात पहिला 'जादूटोणा विरोधी कायदा' पारित केला, त्याच विभागाचे मंत्री आज विज्ञानाला छेद देणारी विधाने करत आहेत. "मंत्री महोदयांचे हे वक्तव्य पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेला आणि संत-समाजसुधारकांच्या विचारांना काळिमा फासणारे आहे. अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही," असे अंनिसने स्पष्ट केले आहे.
'इमारत पाडण्याऐवजी अंनिसला द्या'
यावेळी अंनिसने मंत्र्यांना एक खुले आव्हान दिले आहे. "जर महापालिकेची ही इमारत 'आत्मे' असल्याने मंत्र्यांना काम करण्यायोग्य वाटत नसेल, तर ती पाडण्याचा विचार करू नये. त्याऐवजी ही इमारत अंनिसकडे हस्तांतरित करावी. आम्ही त्या जागेत वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून सामाजिक उपक्रम राबवून दाखवू," असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज
आत्मा, भूत-प्रेत या संकल्पना केवळ मानवनिर्मित असून विज्ञानाच्या कसोटीवर त्या कुठेही सिद्ध झालेल्या नाहीत. जबाबदार लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची विधाने केल्यामुळे समाजात गैरसमज आणि भीतीचे वातावरण निर्माण होते. समाजाने अशा अफवांवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, असे मत अंनिसने मांडले आहे.
या संदर्भातील पत्रक महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे आणि राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.