त्र्यंबकेश्वर, (प्रतिनिधी) १४ एप्रिल - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली सुरू असलेल्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी थेट त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त तथा राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांना पोलिसांनी अटक केली आहे. मंदिर संस्थानाच्या जबाबदार पदावरील व्यक्तीचाच या काळ्याबाजारात सहभाग असल्याचे समोर आल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
त्र्यंबकेश्वर मंदिरात अधिकृतपणे २०० रुपये शुल्क देऊन व्हीआयपी दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, गर्दीचा फायदा घेत काही एजंट भाविकांना तातडीने दर्शन घडवून आणण्याचे आमिष दाखवून ३ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळत होते. या तक्रारींची दखल घेत मंदिर समितीचे अध्यक्ष व न्यायाधीशांच्या आदेशाने पोलिसांनी तपास सुरू केला होता.
पोलीस अधीक्षकांचे 'स्टिंग ऑपरेशन'
नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा केला. पोलिसांनी रचलेल्या जाळ्यात (स्टिंग ऑपरेशन) भाविकांकडून ३ हजार रुपये घेतानाचे पुरावे रेकॉर्ड झाले. यापूर्वी गोटीराम पेहरे याला अटक करण्यात आली होती, तर अभिषेक कडलग अद्याप फरार आहे. या तपासाचे धागेदोरे थेट विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्यापर्यंत पोहोचल्याने सोमवारी रात्री उशिरा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अजून कोणाचे हात गुंतले आहेत?
या रॅकेटमध्ये अनेक लोकांचा समावेश असण्याची शक्यता पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी वर्तवली आहे. "या रॅकेटमध्ये आणखी काही ट्रस्टींचा सहभाग आहे का, याची कसून चौकशी केली जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भक्तांमध्ये संताप: "पाप धुण्यासाठी ज्या दारी भक्त येतात, तिथेच जर श्रद्धेचा असा बाजार मांडला जात असेल तर सामान्य माणसाने दाद कोणाकडे मागायची?" असा संतप्त सवाल आता भाविकांमधून विचारला जात आहे.