इंदिरानगर भागात चेनस्नॅचर्सची दहशत...  मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांची मंगळसूत्रे लंपास...

Share:
Main Image
Last updated: 14-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १४ एप्रिल - शहरात चेनस्नॅचर्स पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, इंदिरानगर भागात सोमवारी (दि.१३) एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील सुमारे १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना: बाप्पा चौकात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरी
द्वारकामाई अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या उषा अरुण पाटील (६५) या सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. बाप्पा चौकातील सप्तशृंगी फ्लोअर मिल समोरून जात असताना दुचाकीवर आलेल्या एका भामट्याने त्यांची वाट अडवली. "कापड दुकान कुठे आहे?" अशी विचारपूस करण्याचा बहाणा करून त्याने पाटील यांच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाचे (६५ हजार रुपये किमतीचे) मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला.

Advertisement

दुसरी घटना: चेतनानगरमध्ये डबलसीट भामट्यांचा थरार
दुसरी घटना चेतनानगर येथील इच्छापूर्ती गार्डन भागात घडली. प्रतिभा आण्णा गोसावी (६५) या मॉर्निंग वॉक आटोपून घरी परतत असताना, जैनब विल्ला बंगल्यासमोर मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना लक्ष्य केले. गोसावी यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाचे (सुमारे १ लाख रुपये किमतीचे) मंगळसूत्र ओरबाडून चोरटे पसार झाले.

पोलीस तपास सुरू:
एकाच दिवशी दोन घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. इंदिरानगर पोलिसांनी दोन्ही घटनांची दखल घेत वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या भामट्यांचा शोध घेत आहेत.

मॉर्निंग वॉकला जाताना महिलांनी शक्यतो समूहाने जावे आणि मौल्यवान दागिने अंगावर घालणे टाळावे. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Comments

No comments yet.