नाशिक, (प्रतिनिधी) १४ एप्रिल - शासकीय कोट्यातून 'सरळ सेवा' अंतर्गत सरकारी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने नाशिकमधील बेरोजगारांना तब्बल ९७ लाख ७९ हजार रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फेसबुकच्या माध्यमातून ओळख वाढवून ही फसवणूक करण्यात आली असून, या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी झाली फसवणूक:
संशयित आरोपी राजेश भारती, शंभुराजे देशमुख उर्फ सचिन हंबीरराव पाटील आणि स्वाती भारती यांनी सोशल मीडियाचा वापर करून बेरोजगार तरुणांशी संपर्क साधला. मोबाईल आणि ईमेल आयडी मिळवून, शासकीय कोट्यातून नोकरी मिळवून देण्याचे आमिष त्यांना दाखवण्यात आले. तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना चक्क वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सही-शिक्क्याचे बनावट नियुक्तीपत्र (Appointment Letter) पाठवण्यात आले.
फसवणुकीचा आकडा वाढण्याची भीती:
मिळालेल्या माहितीनुसार, नियुक्तीपत्र बनावट असल्याचे लक्षात येताच ८ ते १० तरुणांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, फसवणूक झालेल्या तरुणांची संख्या आणि आर्थिक ठकबाजीचा आकडा वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. नातेवाईकांकडूनही लाखो रुपये उकळल्याचे समोर येत आहे.
या प्रकरणी सायबर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. ज्या बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यात आले, त्या खातेधारकांचाही पोलीस शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
कोणत्याही शासकीय नोकरीसाठी सोशल मीडियावरील जाहिरातींना किंवा अनोळखी व्यक्तींना पैसे देऊ नका. अधिकृत संकेतस्थळावरूनच माहितीची शहानिशा करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.