SIT ची चौकशी की 'मेसेज'ची देवाणघेवाण?  चाकणकर भगिनींच्या शिर्डीतील 'तामझाम'वरून खळबळ...  (Video)

Share:
Main Image
Last updated: 14-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १४ एप्रिल - नाशिकमधील गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या (SIT) कार्यपद्धतीवर शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली आहे. "आम्ही एसआयटीला भेटायला गेलो तेव्हा गेट लॉक होते, मग संशयित असलेल्या चाकणकर भगिनींना शिर्डीत विशेष सवलत आणि 'रॉयल ट्रीटमेंट' का मिळाली?" असा रोखठोक सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणातील गूढ आणि पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करताना त्यांनी सरकारला सहा प्रमुख प्रश्न विचारले आहेत.

अंधारेंनी विचारलेले ६ महत्त्वाचे प्रश्न:
१. दमानियांच्या दाव्यावर कारवाई का नाही?
अंजली दमानिया यांनी सादर केलेले सीडीआर (CDR) खोटे आहेत असे जर फडणवीस यांचे म्हणणे असेल, तर अजूनपर्यंत दमानिया यांना अटक का करण्यात आली नाही?
२. चाकणकरांना 'रॉयल ट्रीटमेंट' कशासाठी?
जर दमानियांचे दावे खरे असतील, तर चाकणकर भगिनींची चौकशी एखाद्या सोहळ्यासारखी का पार पडली? त्यांना मिळणारा हा 'तामझाम' नेमके काय सूचित करतो?
३. चौकशी की संदेशाची देवाणघेवाण?
पोलिसांना खरोखरच चाकणकरांची चौकशी करायची होती की त्यांच्या वकिलांमार्फत कुणाला काही महत्त्वाचे निरोप पोहोचवायचे होते?
४. संपर्काचे पुरावे असूनही कारवाई का नाही?
दमानियांच्या दाव्यानुसार खरात आणि चाकणकर यांच्यात २३६ कॉल्स, ३३ मेसेज झाले आहेत आणि समता संस्थेत १५२ खाती आहेत. एवढे गंभीर पुरावे समोर असतानाही कारवाई का रखडली आहे?
५. माजी मुख्यमंत्र्यांची चौकशी कधी?
या प्रकरणाच्या चौकशीच्या फेऱ्यात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दीपक केसरकर यांना कधी बोलावले जाणार आहे?
६. महाराष्ट्र कुणाला वेड्यात काढतोय?
नेमके कोण कुणाला फसवतेय? चाकणकर एसआयटीला, दमानिया महाराष्ट्राला की एसआयटी पीडित महिलांना वेड्यात काढत आहे?

Advertisement

पडदा उघडलाच पाहिजे!
"पत्रकारांना किंवा सामान्य माणसाला साध्या कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जात नाही, मात्र संशयितांसाठी पायघड्या घातल्या जात आहेत," असा गंभीर आरोप अंधारे यांनी केला. या प्रकरणामागे नक्की कोणता मोठा 'सूत्रधार' आहे आणि या कळसुत्री बाहुल्या कोणाच्या इशाऱ्यावर हलत आहेत, याचा पर्दाफाश होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सुषमा अंधारे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता या प्रकरणाला पुन्हा एकदा राजकीय वळण मिळाले असून, सत्ताधारी यावर काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet.