नाशिक, (प्रतिनिधी) १४ एप्रिल - 'सिंहस्थ कुंभमेळा २०२७' ही केवळ एक धार्मिक पर्वणी नसून शहराच्या दीर्घकालीन पायाभूत सुविधा आणि सेवा व्यवस्था बळकट करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे या नियोजनात कोणतीही उणीव राहू नये, यासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना उत्तर प्रदेशचे माजी मुख्य सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी दिल्या. कुंभमेळा व्यवस्थापनातील आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे त्यांनी नाशिकच्या तयारीचा सविस्तर आढावा घेत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. नाशिक येथील स्मार्ट सिटी कार्यालयात सोमवारी पार पडलेल्या या आढावा बैठकीला नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
नियोजनबद्ध अंमलबजावणीवर भर
कुंभमेळ्यासारख्या महासोहळ्यासाठी कामांची वेळेत पूर्तता होणे आवश्यक आहे. त्यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण देखरेख (Monitoring) ठेवणे गरजेचे असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. "सद्यस्थितीचा वापर विविध यंत्रणांच्या चाचणीसाठी (Testing) करावा, जेणेकरून प्रत्यक्ष सोहळ्याच्या वेळी कामकाज अधिक सक्षमपणे पार पडेल," असेही त्यांनी नमूद केले.
तंत्रज्ञानाचा वापर आणि गर्दी व्यवस्थापन
मिश्रा यांनी प्रामुख्याने गर्दी व्यवस्थापन (Crowd Management) आणि प्रशासकीय समन्वयासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे सुचविले. शहरातील निरीक्षण व्यवस्था (Surveillance System) आणि इतर पायाभूत सुविधांची कार्यक्षमता वाढवण्यावर त्यांनी विशेष भर दिला. त्याचबरोबर, भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी शहराचे सौंदर्यीकरण आणि स्वच्छता राखणे हे सर्व संबंधित विभागांचे सामूहिक कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसहभागाचे आवाहन
प्रशासकीय तयारीसोबतच सिंहस्थ यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वच्छता, शिस्त आणि जनजागृती या त्रिसूत्रीवर भर देऊन शहराला सज्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यांची होती उपस्थिती:
या बैठकीला नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, शहर पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, तहसीलदार मकरंद दिवाकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ठळक मुद्दे:
अनुभवाचा शिदोरी: कुंभमेळा व्यवस्थापनातील अनुभवाचा नाशिकच्या नियोजनासाठी वापर.
समन्वयाची गरज: पोलीस, महसूल आणि महापालिका यांच्यात नियमित आढावा बैठका घेण्याच्या सूचना.
स्वच्छता व सौंदर्य: शहराचे रूप पालटण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी विशेष मोहिमेवर भर.
चाचणी (Trial Run): प्रत्यक्ष सिंहस्थापूर्वी यंत्रणांच्या कार्यक्षमतेची तपासणी करणे आवश्यक.