मुंबई, (प्रतिनिधी) १४ एप्रिल - स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा बनाव रचून शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोककुमार खरात याच्या कृत्यांनी देश हादरला असतानाच, आता या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातच्या संपर्कात केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर चक्क १८२५ 'बड्या असामी' होत्या. यात आयजी दर्जाचे पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि नामवंत राजकारण्यांचा समावेश असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया येत्या बुधवारी या सर्वांचे चेहरे मोहरे उघड करणार आहेत.
एक्सेल शीटमध्ये 'व्हीआयपी' नावे
अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना खरातच्या कृष्णकृत्यांचा कच्चा चिठ्ठाच मांडला. त्यांच्याकडे असलेल्या एका एक्सेल शीटमध्ये १८२५ फोन नंबर्स आहेत. हे ते लोक आहेत जे खरातच्या नियमित संपर्कात होते. "या यादीत आयजी, पीआय, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर आणि अशा काही राजकारण्यांची नावे आहेत, जी ऐकून संपूर्ण राज्याला धक्का बसेल," असा दावा दमानिया यांनी केला आहे. हे सर्व पुरावे त्यांनी आता पोलीस प्रशासनाकडे सोपवले आहेत.
एसएमएसद्वारे चालायचे व्यवहार
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, खरात आणि त्याच्या बड्या भक्तांमधील व्यवहार फोन कॉलऐवजी जास्तीत जास्त 'एसएमएस' (SMS) द्वारे व्हायचे. प्रतिभा चाकणकर यांच्या चौकशीचा संदर्भ देत दमानिया यांनी सांगितले की, त्यांचे कॉल रेकॉर्ड्स कमी असले तरी मेसेजेसची संख्या प्रचंड आहे. हे सर्व मेसेजेस संशयास्पद व्यवहारांकडे बोट दाखवणारे आहेत.
ईडीच्या धाडी आणि ठाणे कनेक्शन
भोंदू खरातवर केवळ लैंगिक अत्याचाराचेच नव्हे, तर आर्थिक गैरव्यवहाराचेही आरोप आहेत. आज ईडीने (ED) खरातच्या संबंधित ११ ठिकाणांवर छापेमारी केली. या तपासात खरातचे 'ठाणे' कनेक्शनही समोर आले असून, दमानिया बुधवारी गुगल मॅपच्या सहाय्याने खरातचे ठाण्यातील साम्राज्य आणि तिथले लागेबांधे पुराव्यासह जाहीर करणार आहेत.
"हवालदारापासून ते बड्या अधिकाऱ्यांपर्यंत आणि गल्लीतल्या कार्यकर्त्यापासून ते दिल्लीत वशिला असलेल्या नेत्यांपर्यंत या भोंदूने जाळे विणले आहे. बुधवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल."
— अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या
खरातच्या या प्रकरणामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, बुधवारी नेमकी कोणाची नावे समोर येतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.