नाशिकमध्ये 'टेंडर'च्या नावाखाली मोठी फसवणूक...  ५३ लाखांचे लोखंड उचलले, ४० लाखांना व्यावसायिकाला लुटले....

Share:
Main Image
Last updated: 13-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १३ एप्रिल - शासकीय कामाचे मोठे टेंडर मिळाल्याची बतावणी करून एका स्टील (लोखंड) व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करत तब्बल ४० लाख १५ हजार १८१ रुपयांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

नेमकी घटना काय?
अमृतानगर (पाथर्डी फाटा) येथील कुणाल सदाशिव वडजे यांचा स्टील विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी संशयित प्रज्वल राजेंद्र बोरस्ते (रा. साकोरा मिग, ता. निफाड) आणि राहुल शिवाजी ढोमसे (रा. शिरवाडे, ता. निफाड) यांनी वडजे यांच्याशी संपर्क साधला. आपल्याला शासनाच्या 'नार-पार' नदीजोड प्रकल्पाचे कंत्राट मिळाल्याचे खोटे सांगून त्यांनी वडजे यांचा विश्वास संपादन केला. प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर स्ट्रक्चरल स्टील लागणार असल्याचे सांगून त्यांनी खरेदीचा प्रस्ताव मांडला.

Advertisement

असा केला बनाव
१५ जुलै रोजी या भामट्यांनी वडजे यांच्याकडून ५३ लाख १५ हजार १८१ रुपये किमतीचे स्टील खरेदी करण्याचे आमिष दाखविले. सुरुवातीला केवळ १३ लाख रुपये देऊन त्यांनी ५३ लाखांचे स्टील गोदामातून उचलले. मात्र, उर्वरित ४० लाख १५ हजार १८१ रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली.

स्टील भंगारात विकले!
आठ महिने उलटूनही पैसे मिळत नसल्याने वडजे यांनी संशयितांकडे तगादा लावला आणि स्वतः माहिती घेतली. त्यावेळी त्यांना धक्काच बसला. संशयित बोरस्ते आणि ढोमसे यांनी वडजे यांच्याकडून घेतलेले ५३ लाखांचे मौल्यवान स्टील स्क्रॅप व्यावसायिक इनायत इबादत हुसैन (रा. भाभानगर) याला विक्री केल्याचे उघड झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वडजे यांनी पोलिसांत धाव घेतली.

तिघांवर गुन्हा दाखल
वडजे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी प्रज्वल बोरस्ते, राहुल ढोमसे आणि इनायत हुसैन या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील बोरस्ते हा बांधकाम व्यावसायिक असल्याचे समजते. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भंडे करत आहेत. या घटनेमुळे नाशिकच्या औद्योगिक वसाहतीतील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet.