मुंबईत 'आयईएस स्कील टेक' विद्यापीठ... शैक्षणिक प्रवेश केव्हा मिळणार?

Share:
Main Image
Last updated: 13-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १३ एप्रिल - राज्यातील तरुण पिढीला जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुंबईतील नामांकित 'इंडियन एज्युकेशन सोसायटी'ला (IES) वांद्रे येथे 'आयईएस स्कील टेक विद्यापीठ' स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या महत्त्वपूर्ण प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर स्थापना
हे नवीन विद्यापीठ कायम स्वयंअर्थसहाय्यित खासगी कौशल्य विद्यापीठ म्हणून कार्यरत राहणार आहे. विशेष म्हणजे, आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून या विद्यापीठाचे कामकाज आणि प्रत्यक्ष अध्यापन सुरू होणार आहे. 'कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र' हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या विद्यापीठाची रचना करण्यात आली आहे.

Advertisement

रोजगार आणि कौशल्याची सांगड
सन २०१५ च्या राष्ट्रीय कौशल्य विकास धोरणानुसार, सध्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी आणि प्रत्यक्ष उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ यांच्यातील तफावत दूर करणे आवश्यक आहे. हीच विसंगती दूर करण्यासाठी या विद्यापीठात विविध तांत्रिक आणि नाविन्यपूर्ण कौशल्य विकास अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत.

ठळक वैशिष्ट्ये:
स्थान: वांद्रे, मुंबई.
स्वरूप: कायम स्वयंअर्थसहाय्यित खाजगी कौशल्य विद्यापीठ.
उद्देश: रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करणे.
मार्गदर्शक तत्त्वे: राज्य शासनाच्या २०२१ मधील कौशल्य विद्यापीठ विनियमन व कार्यपद्धतीनुसार स्थापना.

या विद्यापीठामुळे उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण घेतलेले तरुण तयार होतील, ज्यामुळे राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास आणि औद्योगिक विकासाला चालना मिळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments

No comments yet.