भोंदू बाबा अशोक खरातभोवती 'ईडी'चा पाश... नाशिक, पुणे, शिर्डीसह ११ ठिकाणी छापेमारी...

Share:
Main Image
Last updated: 13-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १३ एप्रिल - महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या आरोपांखाली अटकेत असलेला भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराशी जुळले असून, सक्तवसुली संचालनालयाने (ED) सोमवारी राज्यासह नाशिकमध्ये मोठी कारवाई केली. ईडीने खरात आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित नाशिक, पुणे आणि शिर्डी येथील एकूण ११ ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी केली असून, या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

कुठे झाले छापे?
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने या कारवाईत नाशिकमधील पाच, पुण्यातील तीन आणि साईनगरी शिर्डीतील तीन ठिकाणांचा समावेश केला आहे. पहाटेपासूनच सुरू झालेल्या या शोधमोहिमेत खरातच्या निकटवर्तीयांची घरे आणि कार्यालये ईडीच्या रडारवर होती.

Advertisement

आर्थिक अनियमिततेचा मोठा संशाय
अशोक खरात याने केवळ महिलांचे लैंगिक शोषणच केले नाही, तर अनेकांची दिशाभूल करून त्यांची कोट्यवधींची मालमत्ता हडप केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ईडीने खरातविरुद्ध 'ईसीआयआर' (ECIR) दाखल करून तपास हाती घेतला आहे. या छाप्यांदरम्यान पथकाने महत्त्वाची कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि बेनामी मालमत्तेशी संबंधित दस्ताऐवजांची कसून छाननी केली आहे.

काय आहेत आरोप?
लैंगिक शोषण: आध्यात्मिक शक्तीचा वापर करण्याच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणे.
फसवणूक: भक्तांची दिशाभूल करून त्यांना आर्थिक जाळ्यात ओढणे.
संपत्ती हडपणे: भीती दाखवून किंवा संमोहित करून अनेकांच्या स्थावर मालमत्ता स्वतःच्या किंवा साथीदारांच्या नावावर करून घेणे.

खळबळजनक खुलासा होण्याची शक्यता
या छापेमारीत हाती लागलेल्या कागदपत्रांमुळे खरात याने हा काळा पैसा कुठे गुंतवला आणि यात आणखी कोणते मोठे मासे अडकले आहेत, याचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडीच्या या एन्ट्रीमुळे हे प्रकरण आता केवळ फौजदारी गुन्ह्यापुरते मर्यादित न राहता आंतरराज्यीय आर्थिक घोटाळ्याच्या वळणावर येऊन ठेपले आहे.

Comments

No comments yet.