नाशिक, (प्रतिनिधी) १२ एप्रिल - पेठरोडवरील मेहरधाम परिसरात एका २० वर्षीय विवाहितेवर तिच्याच नातेवाईक महिलेने उकळते तेल फेकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १०) दुपारी घडली. सोसायटीतील सदस्याची पुतणी असल्याची बतावणी करत आणि मदतीचा बहाणा करून हे क्रूर कृत्य करण्यात आले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी संशयित महिला यशोदा ज्ञानेश्वर गोसावी (३६, रा. पिंपळगाव बसवंत) हिला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वरी राहुल गिरी (२०, रा. स्वामी श्रद्धा अपा., यशोदानगर) या विवाहिता आपल्या सासू पदमाबाई गिरी यांच्यासोबत दुपारी जेवण करत होत्या. ज्ञानेश्वरी यांचे पती कामावर गेलेले असताना दुपारी अचानक घराची बेल वाजली. ज्ञानेश्वरी यांनी दरवाजा उघडला असता, तोंडाला स्कार्फ बांधलेली एक महिला समोर उभी होती.
पापड बनवण्याचे दिले कारण
संशयित यशोदा गोसावी हिने आपली ओळख लपवून इमारतीच्या वरील मजल्यावर राहणाऱ्या गोसावींची पुतणी असल्याचे सांगितले. "आम्ही गच्चीवर पापड करत आहोत, हे तेल गरम करून द्या," अशी विनंती तिने केली. सासूने मदतीसाठी संमती दिल्याने ज्ञानेश्वरी यांनी तेल गरम करून दिले.
चेहरा तेलात बुडवण्याचा प्रयत्न
तेल उकळल्यानंतर यशोदाने ते पातेले ताब्यात घेताना अचानक ज्ञानेश्वरीची मान पकडून तिचा चेहरा उकळत्या तेलाच्या पातेल्यात दाबण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरी यांनी जिवाच्या आकांताने प्रतिकार केला, मात्र यादरम्यान संशयित महिलेने पातेल्यातील सर्व उकळते तेल ज्ञानेश्वरीच्या अंगावर फेकले.
पोलिसांनी केली अटक
या हल्ल्यात ज्ञानेश्वरी गंभीररीत्या भाजल्या असून त्यांनी आरडाओरड करत घराबाहेर धाव घेतली. स्थानिकांनी तातडीने धाव घेत पोलिसांना पाचारण केले. योगायोगाने ही संशयित महिला ज्ञानेश्वरीच्या बहिणीची मावस सासू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तपासाचे चक्र वेगाने:
जखमी विवाहितेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून, कौटुंबिक वादातून किंवा अन्य कोणत्या कारणातून हा हल्ला झाला, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर करत आहेत.