नाशकातील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण...  अखेर आयटी कंपनीकडून अधिकृत निवेदन जारी... काय म्हटलंय त्यात?

Share:
Main Image
Last updated: 12-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १२ एप्रिल - नाशिक येथील एका नामवंत बहुराष्ट्रीय आयटी (IT) कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आता कंपनी प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. पोलीस कोठडीत असलेल्या सर्व ८ संशयित आरोपी कर्मचाऱ्यांचे कंपनीने तडकाफडकी निलंबन केले असून, या प्रकरणावर आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.

नेमके प्रकरण काय?
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील या आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय, कामाच्या ठिकाणी धार्मिक भावना दुखावणारे कृत्य आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे खळबळजनक प्रकार समोर आले होते. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, विविध संघटनांसह भाजपने कंपनीच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत आठ जणांना अटक केली असून सध्या त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.

Advertisement

कंपनीची पहिली अधिकृत प्रतिक्रिया
वातावरण तापलेले असतानाच संबंधित बहुराष्ट्रीय कंपनीच्या प्रवक्त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली बाजू मांडली आहे. "आमच्या कंपनीत कोणत्याही प्रकारच्या छळवणूक आणि जुलूमाविरुद्ध 'शून्य सहनशीलता' (Zero Tolerance) धोरण आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा, सन्मान आणि कल्याणाशी आम्ही कधीही तडजोड करत नाही. नाशिकमधील घटनेची माहिती मिळताच आम्ही अंतर्गत चौकशी सुरू केली आहे," असे कंपनीने म्हटले आहे.

तपास पूर्ण होईपर्यंत निलंबन
कंपनीने पुढे स्पष्ट केले की, "पोलिस तपासात असलेल्या आठही कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. आम्ही स्थानिक पोलीस प्रशासनाला तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत. या प्रकरणाच्या चौकशीतून जे निष्कर्ष निघतील, त्यानुसार पुढील अंतिम कायदेशीर कारवाई केली जाईल."

तपासाकडे सर्वांचे लक्ष
या प्रकरणातील आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्यांच्याकडून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात आहेत का? तसेच धर्मांतरासारख्या गंभीर बाबींचे धागेदोरे कोठे जोडलेले आहेत? याचा शोध पोलीस घेत आहेत. कंपनीच्या या निर्णयामुळे पीडित महिलांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी आता पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होते आणि आरोपींना काय शिक्षा मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet.