पुणे, (प्रतिनिधी) १४ एप्रिल - सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि त्यांना अश्लील तसेच घातक कंटेंटपासून वाचवण्यासाठी 'इन्स्टाग्राम'ने (Meta) भारतात कडक पावले उचलली आहेत. १८ वर्षांखालील मुलांसाठी आता 'टीन अकाऊंट्स' (Teen Accounts) हा नवीन बदल अनिवार्य करण्यात आला असून, यामुळे पालकांना मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येणार आहे.
'PG-13' धर्तीवर कंटेंटचे फिल्टरिंग
इन्स्टाग्रामने आपल्या धोरणात बदल करून किशोरवयीन मुलांसाठी 'PG-13' (१३ वर्षांवरील मुलांसाठी योग्य) चित्रपट मानांकनाप्रमाणे फिल्टर लावले आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश असेल:
अश्लील कंटेंटवर बंदी: लैगिंक सूचक (Sexually Suggestive), हिंसाचार किंवा प्रौढांसाठी असलेल्या कंटेंटवर पूर्णपणे निर्बंध लादले जातील.
कडक सर्च फिल्टर: दारू, ड्रग्ज किंवा स्वतःला इजा करून घेण्यासारख्या संवेदनशील विषयांचे सर्च रिझल्ट आता किशोरवयीन मुलांना दिसणार नाहीत. स्पेलिंगमध्ये चूक असली तरी हे फिल्टर काम करतील.
मर्यादित फीड: केवळ मुलांच्या वयाला साजेशीच माहिती त्यांच्या फीडमध्ये, रिल्समध्ये किंवा 'एक्सप्लोर'मध्ये दाखवली जाईल.
पालकांच्या हाती 'रिमोट कंट्रोल'
या नवीन नियमांमुळे १८ वर्षांखालील मुलांचे अकाऊंट बाय डिफॉल्ट 'प्रायव्हेट' असतील. मुले या सेटिंग्ज स्वतःहून बदलू शकणार नाहीत; त्यासाठी पालकांची अधिकृत परवानगी आवश्यक असेल. याशिवाय पालकांसाठी 'लिमिटेड कंटेंट' हा विशेष पर्याय देण्यात आला आहे, ज्याद्वारे ते आपल्या पाल्याच्या अकाऊंटवरील कमेंट्स आणि संवाद अधिक कडकपणे नियंत्रित करू शकतील.
अतिवापर रोखण्यासाठी 'स्लीप मोड'
सोशल मीडियाच्या व्यसनापासून मुलांना दूर ठेवण्यासाठी रात्री १० ते सकाळी ७ या वेळेत 'स्लीप मोड' आपोआप सक्रिय होईल. या काळात येणारे नोटिफिकेशन म्यूट राहतील आणि मेसेजला ऑटो-रिप्लाय जाईल. तसेच, मुले दिवसातील ६० मिनिटांपेक्षा जास्त वेळ ॲप वापरत असल्यास त्यांना 'ब्रेक' घेण्याची आठवण करून दिली जाईल.