नाशिक, (प्रतिनिधी) १२ एप्रिल - नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन (NDCA) तर्फे आयोजित आणि फ्रावशी इंटरनॅशनल पुरस्कृत 'नाशिक महिला प्रीमियर लीग' (NWPL) च्या तयारीने आता वेग घेतला आहे. या स्पर्धेतील पाचही फ्रँचायझी संघांचे 'आयकॉन' खेळाडू लिलावाद्वारे निश्चित करण्यात आले असून, यात अष्टपैलू खेळाडू रसिका शिंदे हिला सर्वाधिक २८,५०० पॉईंट्ससह 'मराठा वॉरिअर्स'ने आपल्या संघात स्थान दिले आहे.
५ संघ, ५ आयकॉन आणि लिलावाचा थरार
येत्या २५ एप्रिल ते १ मे या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. प्रत्येक संघाकडे खेळाडू निवडीसाठी एकूण १,००,००० पॉईंट्स उपलब्ध होते. आयकॉन खेळाडूंच्या लिलावात मिळालेली पसंती आणि खर्च केलेले पॉईंट्स खालीलप्रमाणे आहेत:
संघ मालक आयकॉन खेळाडू खर्च केलेले पॉईंट्स
मराठा वॉरिअर्स वैभव पाटील रसिका शिंदे २८,५००
दि रायजिंग स्टार्स प्रिन्सी लांबा ईश्वरी सावकार २५,०००
सांगळे स्ट्राईकर्स अनंत सांगळे शाल्मली क्षत्रिय ११,५००
जिजामाता स्क्वाड एम. व्ही. पी. ज्ञानदा निकम ५,०००
बालाजी सुपर नोव्हाज कल्पेश भुतडा तेजस्विनी बाटवाल ५,०००
खेळाडूंची कामगिरी आणि अनुभव
रसिका शिंदे (मराठा वॉरिअर्स): महाराष्ट्राच्या वरिष्ठ, २३ आणि १९ वर्षांखालील संघात प्रतिनिधीत्व केलेली अनुभवी अष्टपैलू खेळाडू.
ईश्वरी सावकार (दि रायजिंग स्टार्स): १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाची माजी कर्णधार. नुकत्याच झालेल्या बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यात ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणारी सलामीवीर.
शाल्मली क्षत्रिय (सांगळे स्ट्राईकर्स): बीसीसीआयच्या एन.सी.ए. (NCA) शिबिरासाठी सातत्याने निवड होणारी वेगवान गोलंदाज आणि फलंदाज.
तेजस्विनी बाटवाल (बालाजी सुपर नोव्हाज): पश्चिम विभाग आणि महाराष्ट्र वरिष्ठ संघाची यष्टीरक्षक फलंदाज. उत्तर प्रदेश आणि आसाम विरुद्ध सलग तीन अर्धशतके झळकावण्याचा तिचा विक्रम आहे.
ज्ञानदा निकम (जिजामाता स्क्वाड): मालेगावची ही अष्टपैलू खेळाडू फिरकी गोलंदाजीसाठी ओळखली जाते. तिने यापूर्वी 'रत्नागिरी जेट्स'चेही प्रतिनिधित्व केले आहे.
१४ एप्रिलला खेळाडूंचा लिलाव
आयकॉन खेळाडूंची निवड झाल्यानंतर आता उर्वरित खेळाडूंची लिलाव प्रक्रिया गुरुवारी, १४ एप्रिल रोजी पार पडणार आहे. नाशिकमधील महिला क्रिकेटला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरेल, असा विश्वास एन.डी.सी.ए.चे सेक्रेटरी समीर रकटे यांनी व्यक्त केला आहे.