नाशिक, (प्रतिनिधी) १२ एप्रिल - धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि ईडी-आयकर विभागाची भीती दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणारा भोंदू अशोक खरात सध्या पोलिसांच्या चक्रव्यूहात पुरता अडकला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) दररोज ८ ते १० तासांच्या मॅरेथॉन चौकशीमुळे खरात मानसिकदृष्ट्या खचला असून, "चौकशीपेक्षा मरण परवडेल" अशी भाषा तो करू लागला आहे. दरम्यान, या प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) उडी घेतली असून खरात दाम्पत्याची बँक खाती सील केली आहेत.
कोण तो 'शिजूका-नॉडी'? दमानियांचा सवाल
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डबाबत (CDR) केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप आला आहे. खरातला 'शिजूका' आणि 'नॉडी' या नावांनी शेकडो कॉल्स आल्याचे समोर आले आहे. ही टोपणनावे नेमकी कोणाची? यामागे कोणते राजकीय नेते दडले आहेत? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला असून काही बड्या नावांचा थेट उल्लेख केल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.
शक्तिपीठ महामार्गावर ११ एकरांची 'फील्डिंग'
तपासात खरातचे धक्कादायक 'लँड कनेक्शन' समोर आले आहे. ज्या मार्गावरून बहुचर्चित शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे, त्याच कळमण गावात खरातने सुमारे ११ एकर (४.४८ हेक्टर) जमीन खरेदी केली आहे.
जमिनीचा तपशील: गट क्रमांक २००/१, कळमण.
व्यवहाराची किंमत: मार्च २०२४ मधील खरेदीखतानुसार २ कोटी ४० लाख ९१ हजार २०० रुपये.
संशय: महामार्गाची गुप्त माहिती खरातला कोणी पुरवली? यात कोणत्या बड्या शासकीय अधिकाऱ्यांचा हात आहे का? याचा तपास आता सुरू झाला आहे.
तपासातील महत्त्वाचे मुद्दे:
ईडीची कारवाई: खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांची तीन बँक खाती सील करण्यात आली आहेत. नाशिक, पुणे, मुंबई आणि अहिल्यानगरमधील व्यवहारांची ईडीकडून तपासणी सुरू आहे.
गुन्ह्यांची मालिका: खरातवर आतापर्यंत १५ गुन्हे दाखल आहेत. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांत त्याने कबुली दिली असली तरी, लैंगिक शोषणाच्या आरोपांवर त्याने अद्याप मौन पाळले आहे.
मोडस ऑपरेंडी: स्वतःला दैवी अवतार भासवून महिलांना जाळ्यात ओढणे आणि श्रीमंत भक्तांना तपास यंत्रणांची भीती दाखवून पैसे उकळणे, अशी त्याची कार्यपद्धती होती.
"माझं मरण इथेच आहे!"
१८ मार्चपासून कोठडीत असलेला खरात सलग २५ दिवसांच्या चौकशीमुळे त्रस्त झाला आहे. "मी इथून बाहेर पडू शकणार नाही, माझे मरण इथेच आहे," असे तो आता बोलू लागला आहे. चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी तो मानसिक तणावाखाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अशोक खरातच्या या काळ्या कृत्यांचे धागेदोरे आता मंत्रालयापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात असून, 'शिजूका-नॉडी'च्या नावामागचा चेहरा लवकरच समोर येण्याची चिन्हे आहेत.